५ ऑक्टोबरला कोल्हापुरात साखर कामगारांचा इशारा मोर्चा
B.I.R. Act पूर्ववत करण्यासह विविध मागण्यांसाठी कामगारांची एकजूट
कोल्हापूर | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील साखर कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीने सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे भव्य इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४७ अर्थात B.I.R. Act रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे साखर उद्योगातील सुमारे अडीच लाख कामगारांच्या हक्कांबाबत प्रश्न निर्माण झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चामध्ये B.I.R. Act पूर्ववत करावा, साखर कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, बंद व आजारी साखर कारखाने सुरू करून कामगारांचे पुनर्वसन करावे, तसेच रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक आणि तात्पुरत्या कामगारांना कारखान्याच्या सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
तसेच साखर उद्योगाला उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) वाढ करावी, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे.
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्रातील साखर कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र शिवाजीराव तावरे-पाटील यांनी केले आहे.
“साखर कामगार एकजुटीचा विजय असो” आणि “साखर कामगारांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र एकवटला पाहिजे” असा निर्धार संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

