सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा आदेश
सोलापूर, दि. 28 (जिमाका) : सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा व मुरघास जिल्ह्याबाहेर किंवा अन्य राज्यात वाहतूक करून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर एस. कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अन्वये हा आदेश जारी केला आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पशुधनास अंदाजे पुढील 120 दिवस म्हणजे डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा व मुरघास इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांत वाहतूक करून विक्री झाल्यास जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होऊन चारा टंचाई व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जून 2027 अखेर पर्यंत आदेश लागू
सदर आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा व मुरघास इतर जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून जून 2027 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित प्रशासकीय, पोलीस, कृषी, पशुसंवर्धन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.

