वसंत फेस्टिवल मध्ये बहारदार नृत्य अविष्काराने जिंकली रसिकांची मने
वाडीकुरोली ता. पंढरपूर येथे वसंतराव काळे शैक्षणिक संकुलामध्ये वसंत फेस्टिवल 2024 मध्ये सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
वसंतदादा काळे यांचे ८० व्या जयंतीनिमित्त श्रीराम मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील संलग्नित सर्व शाखांमधील कलाकारांचा गायन,नृत्य, नाट्य, देशभक्तीपर गीते प्रासंगिक नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे व मोनिका ताई काळे यांच्या शुभहस्ते रंगमंचाचे पूजन करुन करण्यात आले.
या सांस्कृतिक महोत्सवामध्ये वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली यांनी सादर केलेल्या बाई पण भारी देवा या प्रासंगिक नृत्यास महीला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. तसेच त्रिपुरा राज्याच्या आदिवासी नृत्य व खंडोबाचा जागर करताना मल्हारी पिवळा झाला या सादर केलेल्या लोकनृत्याने रसिकांना ठेका धरायला लावला . भैरवनाथ विद्यालय आढिवने संतांचा दिंडी सोहळा, देशभक्तीपर नृत्य, मर्दानी झाशीची राणी या प्रासंगिक नृत्याचे उत्तम सादरीकरण केले. श्रीमंतराव काळे विद्यालय जैनवाडी यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाला बहारदार सुरुवात झाली आईचा जोगवा मागते या गीताने उत्तम सादरीकरण त्यांनी केले .
मॉडर्न हायस्कूल पिराचीकुरोली यांनी कुऱ्या चालल्या रानात या शेतकरी नृत्यातून बळीराजाची व्यथा मांडून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले . रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या लहान मुलांनी सादर केलेल्या हॉरर थीम डान्स ला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले तर महाराष्ट्राची लोकधारा व भारतीतील विविधतेतील एकात्मतेचा संदेश देणारे प्रासंगिकनृत्य सादर करून एकतेचा संदेश दिला. वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने देशभक्तीपर नृत्य सादर केले जनकल्याण व मुक्ताई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या मुलींनी कोराना संकटकाळातील भारताचे अमूल्य योगदान यावर आधारित कोविड योद्धा ही नाटिका सादर केली.वसंतराव काळे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मंगळागौर व जोगवा नृत्याचे बहारदार सादरीकरण केले.
या कार्यक्रमास श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत साखर निर्यात करणारे उद्योजक हिम्मत आसबे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी संचालिका संगीताताई काळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ पालक शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांचे शाखाप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्तम व बहारदार सादरीकरण होण्यासाठी सर्व शाखातील सांस्कृतिक विभाग प्रमुख व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांनी मानले.