माघी यात्रेत दर्शनरांगेतील भाविकांना अत्याधुनिक सोई सुविधा
मंदिर समितीने घेतली आढावा बैठक
परिवार देवता मंदिराच्या संवर्धन व जिर्णोद्वार कामास लवकरच सुरूवात - श्री गहिनीनाथ महाराज औसेकर.
पंढरपूर (ता.18) - दि. 20 जानेवारी, 2024 रोजी जया एकादशी म्हणजेच माघ यात्रा संपन्न होत आहे. यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधेचा आढावा घेण्यात आला. तसेच दर्शन रांगेची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविणे, चांगली स्वच्छता व्यवस्था, अन्नदान, आरोग्य व्यवस्था व इतर अनुषंगिक सोयी सुविधां उपलब्ध करून देण्याचे निर्देश सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले.
तसेच पत्राशेड येथे अन्नछत्राचा शुभारंभ श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते व सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी श्री राजेन्द्र शेळके, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख श्री बलभीम पावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
मंदिर समितीची रविवार, दि. 18 फेब्रुवारी, 2024 रोजी स. 11.00 वा. श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेत माघ यात्रा 2024 च्या नियोजनाचा तसेच श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार कामाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय, पंढरपूर शहर व परिसरातील 24 परिवार देवतांच्या मंदिराचे संवर्धन व जिर्णोद्वार आराखडा तयार करून पुरातत्व विभागा मार्फत ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये मे.सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची ई निविदा (रू.12,84,89,092/-) मंजुर करण्यात आली आहे. यामध्ये एकविरादेवी, खंडोबा, सोमेश्वर, रिध्दि सिध्दी, लक्ष्मण पाटील, विष्णूपद, नारदमुनी, लखूबाई, अंबाबाई, व्यास नारायण, पद्मावती, यमाई तुकाई, त्र्यंबकेश्वर, काळभैरव नवग्रह, शाकंभरीदेवी, नरसोबा, मारूतीचा पार, काळा मारूती, यल्लमादेवी, रामबागचा मारूती, तांबडा मारूती, रोकडोबा, सटवाई इत्यादी देवतांच्या मंदिराचा समावेश आहे. या मंदिरांच्या विकासात्मक कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येत आहे.
या सभेस सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री.संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ हे समक्ष तर, डॉ.दिनेशकुमार कदम, श्री.भास्करगिरी बाबा, श्री.अतुलशास्त्री भगरे गुरूजी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तसेच कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड व सर्व खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील बी, सी व डी विंग इमारतीचा तिसरा मजला वातानुकुलित करणे, कर्मचारी अनुकंपा नियमावलीस व व्यवस्थापनावरील खर्च दान निधीच्या एकूण उत्पन्नाच्या 10 वरून 20 टक्के करण्यास धर्मादाय आयुक्त यांनी मंजुरी दिल्यानुसार शासनास अंतिम मंजुरीसाठी सादर करणे, कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांस प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, माघ एकादशीला श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेची नित्यपुजा अनुक्रमे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्र्वर देशमुख जळगावकर व श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. त्यादिवशी मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात येत आहे.
तसेच पंढरपूरचे तहसिलदार श्री.सचिन लंगुटे, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.प्रशांत जाधव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.विश्वजित घोडके, मंदिर शाखा पोलीस निरीक्षक श्री.महेश ढवण यांच्याशी यात्रेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली व श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नेमणूक झाल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने मा.सह अध्यक्ष व सदस्य महोदयांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.