विद्यार्थी दशेत केलेल्या परिश्रमाचे फळ हे नोकरी करताना मिळते - सहा.मो.वा.नि.कुलदीप पवार स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये पालक मेळावा संपन्न

0
विद्यार्थी दशेत केलेल्या परिश्रमाचे फळ हे नोकरी करताना मिळते  - सहा.मो.वा.नि.कुलदीप पवार 

स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये पालक मेळावा संपन्न

पंढरपूर– स्वेरीमधील सर्वच उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्याचे कारण म्हणजे स्वेरीमध्ये प्राचार्य डॉ.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांकडून मिळत असलेले बहुमोल शिक्षण होय. अभ्यासावर अधिक भर असल्यामुळेच विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम घडत आहे हा स्वेरीचा इतिहास आहे. त्यातून डॉ.रोंगे सरांचे दूरदर्शी विचार सुरवातीला अत्यंत कठोर वाटतात परंतु ज्यावेळी शिक्षण संपल्यानंतर आपण नोकरी करू लागतो तेव्हा मात्र स्वेरीतून दिलेल्या संस्काराच्या शिदोरीची मात्र आवर्जून आठवण येते. विद्यार्थी दशेत केलेल्या परिश्रमाचे फळ हे नोकरी करताना मिळत असते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी व उस्मानाबाद मध्ये कार्यरत असणारे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तथा सहाय्यक आरटीओ कुलदीप पवार यांनी केले. 
           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजिलेल्या ‘पालक मेळाव्या’ प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सहा.मो.वा.नि. कुलदीप पवार यशाचे कानमंत्र देत होते. याप्रसंगी सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील जवळपास २५० हून अधिक पालक वर्ग उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली हा पालक मेळावा घेण्यात आला. पालक प्रतिनिधी म्हणून डेक्कन मेकॅनिकल अँड केमिकल इंडस्ट्रीजचे वरिष्ठ व्यवस्थापक युवराज काळे तसेच महिला पालक प्रतिनिधी सौ.अर्चना भूमकर हया उपस्थित होत्या. प्रास्ताविकात डॉ.संदीप वांगीकर यांनी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, संशोधनासाठी मिळालेला निधी, उच्च शिक्षित प्राध्यापक, उपलब्ध साहित्य सामग्री, सोयी, सुविधा, कमवा आणि शिका योजना, रात्र अभ्यासिका, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सोलार रुफ टॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत झालेल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, बस सुविधा, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेच्या लिज लाईनसह वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम आदी सुविधांची माहिती दिली. तसेच स्वेरीमध्ये  पदवी अभियांत्रिकीच्या जवळपास तिसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी कोणती तयारी करून घेतली जाते व विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पॅकेजच्या कंपन्या कशा मिळतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे महत्व, विविध कंपन्या, कोअर कंपन्या, गेट परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टींना कसे प्राधान्य द्यायचे? या महत्वाच्या विषयांची देखील माहिती दिली. पुढे बोलताना सहा. आरटीओ कुलदीप पवार म्हणाले की, ‘२०१८ साली स्वेरीतून माझ्यासह तब्बल १६ जण एकाचवेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक झालो. आज अवघड काम करताना हलके जाणवते. कारण आत्ताची तयारी मी स्वेरीमध्ये विद्यार्थी दशेत असताना केली होती. आज माझ्या यशात ८० टक्के वाटा हा स्वेरीतील शिस्तीचा आहे. हे मी त्यावेळी देखील सांगितले होते आणि आत्ताही सांगतो. ‘ट्युशन फ्री’ कल्चर असल्यामुळे शिकवणी साठी कुठेही जावे लागले नाही. त्यामुळे माझ्या मते स्वेरी म्हणजे ‘वन वे ट्राफिक’ आहे. स्वेरीतुन मनापासुन शिक्षण घेतल्यास फक्त यशाचाच मार्ग दिसतो.’ असे सांगून स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. महिला पालक प्रतिनिधी सौ.अर्चना भूमकर म्हणाल्या की, ‘स्वेरी हे शिस्त आणि संस्काराचे माहेरघर आहे. त्यामुळे आमचे पाल्य या ठिकाणी घडतात. संस्थेच्या नियमांमुळे व अभ्यासातील पाठपुराव्यामुळे आम्ही पालक वर्ग अत्यंत समाधानी आहोत.’ ‘कॅड वॉर’ स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे सत्यजित विठ्ठल गोफणे यांनी आठ ठिकाणी पारितोषक  मिळविल्यामुळे आणि तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या आदिती कदम यांचा ‘कोड माइंड टेक्नोलॉजी’ या कंपनीमध्ये प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड झाल्यामुळे दोघांचाही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर पालकांनी आपल्या पाल्यांचे वर्ग शिक्षक, प्रॉक्टर टीचर व संबंधित इतर प्राध्यापकांच्या भेटी घेवून पाल्याच्या प्रगतीबाबत विचारणा करून अधिक माहिती घेतली. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील असे मिळून जवळपास २५० हून अधिक पालक, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, स्वेरीचे प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील, प्लेसमेंट विभागातील ट्रेनिंग अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदिपराज साळुंखे यांनी केले तर डॉ.श्रीकृष्ण भोसले यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !