‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.’ - डॉ. प्रशांत नलावडे

0
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.’ -  डॉ. प्रशांत नलावडे

पंढरपूर – “भारतीय समाजातील विषमतावादी व्यवस्था झुगारून देवून समताधिष्ठीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी जीवन भर प्रयत्न केले. इथल्या व्यवस्थेने आंबेडकरांना जिवंतपणी तर छळलेच होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर देखील छळ केला. मात्र डॉ. आंबेडकर यांनी केलेले कार्य आणि विचार हे समस्त भारतीय वर्गासाठी उपकारकच
आहेत. डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता लक्षात घेवून कोलंबिया विद्यापीठाने आजवरचा सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांनी दखल घेतली आहे. म्हणून डॉ. आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात.” असे प्रतिपादन डॉ.
प्रशांत नलावडे यांनी केले.
                रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती आणि इतिहास विभागाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रस्तुतता’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. हनुमंत लोंढे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

                डॉ. प्रशांत नलावडे पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना पुरोगामी विचाराचा वारसा महात्मा ज्योतीराव फुले आणि सुभेदार रामजी आंबेडकर यांच्याकडून लाभला. छत्रपती शिवाजी महाराज ही आंबेडकरांची प्रेरणा होती. मॅट्रीक परीक्षा पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी भेट दिलेल्या गौतम बुद्धांच्या चरित्र ग्रंथाने त्यांच्यावर पुरोगामी विचार कोरले गेले. महात्मा गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कार्याने प्रेरित होवून डॉ. आंबेडकरांनी सामाजिक हिताचे कार्य केले. कर्मवीर भाऊराव पाटील आणि महाराजा सयाजी गायकवाड यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. डॉ.
आंबेडकर यांनी केलेले कार्य हे समस्त भारतियांसाठी मोलाचे आहे.”

                अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे
म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चांगले वाचक होते. त्यांनी ग्रंथासोबत दोस्ती केली होती. स्वत:च्या वैयक्तिक ग्रंथालयात पंचवीस हजाराहून अधिक ग्रंथांची उपलब्धता त्यांनी करून ठेवली होती. पुस्तकासाठी
घर बांधणारे डॉ. आंबेडकर हे जागतिक स्तरावरील एकमेव विद्वान होते. त्यांचे ग्रंथावर विशेष प्रेम होते. सातत्त्यपूर्ण वाचन हा त्यांचा व्यासंग होता. म्हणूनच ते जागतिक दर्जाचे विद्वान बनू शकले. डॉ. आंबेडकर यांचा हा गुण विद्यार्थ्यांनी अंगिकारला पाहिजे. समाजजीवनातील सर्व क्षेत्रातील अभ्यास त्यांनी केला होता. राज्यशास्त्र, समाजशास्त्र,
अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, शिक्षणशास्त्र, विधी क्षेत्र अशा बत्तीस प्रकारच्या पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. ज्ञानाचा महासागर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

                या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत समारंभ समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर,ज्युनिअर विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने
उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा बडवे-वैद्य
यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !