सहकार शिरोमणीच्या 234 सभासदांचे मतदानाचे हक्क कायम.प्रादेशिक सहसंचालकांनी दिला निर्णय
भाळवणी दि.24:- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या निवडणुकीत 234 सभासदांचे नांव मतदार यादीतून वगळण्यात यावे अशा प्रकारची हरकत प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीनंतर अभिजित पाटील गटाच्या वतीने घेण्यात आली होती. त्यावर सुनावणी होवून प्रादेशिक सहसंचालक यांनी सदर सर्व सभासदांचे मतदानाचे हक्क कायम ठेवले आहेत. या निर्णयामुळे पाटील गटावर नामुष्की आली असून त्यांना निवडणुक काळात या सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकी करीता कारखान्याने प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांचेकडे प्रारुप मतदार यादी सादर केलेली होती. सदर यादीतील मतदार यादीतून नांवे वगळण्यात यावीत यासाठी नितीन भारत पवार खेडभाळवणी यांनी- 29, रामचंद्र भगवान ढोबळे, केसकरवाडी यांनी-27, नंदकुमार मधुकर फाळके रा.पांढरेवाडी यांनी -24, संदिपान निवृत्ती मोरे-07, नागनाथ जनार्धन शिंदे-08, नामदेव हणमंत पवार मेंढापूर यांनी-05 , गणेश गोपाळराव पाटील खरसोळी-06, भारत मधुकर निंबाळकर गार्डी-05, पांडुरंग गोपाळ घाडगे अजनसोंड-09, पांडुरंग आप्पा शिंगटे करोळे-02, मधुकर सुखदेव आसबे शेळवे-07, समाधान तुकाराम लोमटे पुळूज-12, नंदकुमार पांडुरंग बागल पळशी-02, धनंजय उत्तम काळे वाडीकुरोली-90 इ. एकूण 234 सभासदांची नांवे मतदार यादीतुन वगळण्यात यावीत आशा हरकती घेतल्या होत्या त्यापैकी नंदकुमार मधुकर फाळके व मधुकर सुखदेव आसबे यांनी घेतलेल्या हरकती स्वत:हून माघारी घेतल्या.
यावर प्रादेशिक सहसंचालक यांनी सदर 234 सभासदांना कारखान्याच्या नियमानुसार सभासदत्व् करुन घेतले असून, त्यांचे आय रजिस्टरला रितसर नोंद असल्या कारणाने त्यांची नांवे कायम ठेवण्यात यावीत असा युक्तीवाद कारखान्याचेवतीने ॲड.एस.बी.इनामदार व ॲड.भगवान भादुले यांनी केला. तर सदर सभासदांच्या नावावर शेत जमीनी नसल्याचे पुरावे सादर करुन ही नांवे मतदार यादीतून वगळण्यात यावीत असा युक्तीवाद ॲङ.रोंगे यांनी केला वरील युक्तीवाद ऐकून प्रादेशिक सहसंचालक यांनी 234 सभासदांना मतदाराचा अधिकार अबाधित ठेवण्याचा आदेश दिला. नावात दुरुस्ती करणेकामी नागनाथ सोपान माळी रोपळे, आप्पासो आंबादास बागल पळशी, बाबासो बजरंग बागल पळशी यांनी हरकत घेतली होती. सदर हरकतीची सुनावणी होवुन आप्पासो आंबादास बागल पळशी, बाबासो बजरंग बागल यांची हरकत मान्य करण्यात आली व नागनाथ सोपान माळी या हरकतदाराचे रेकॉर्डवर नागनाथ सोपान लोखंडे आहे, रेकॉर्डवर नांव दुरुस्ती केल्याशिवाय मतदार यादीतील नांव दुरुस्ती करता येणार नाही म्हणुन प्रारुप मतदार यादीतील नांव आहे असे ठेवण्यात आले.
निवडणुक कालावधीमध्ये मतदार यादीतील नांवे वगळण्यासाठी अभिजीत पाटील गटाच्यावतीने कसोशिने प्रयत्न करण्यात आले होते त्यासाठी कागदपत्राची जमवाजमव करुन न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी पाटील गटाने ठेवली होती मात्र प्रादेशिक सहसंचालक यांनी 234 सभासदांचा मतदानाचा हक्कम कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे पाटील गटाला वरील सभसदांच्या रोषाला निवडणुक काळात सामोरे जावे लागणार आहे.