अरे बापरे...! सांगली पोलीस ठाण्यातील पोलीसाचा धक्कादायक प्रकार
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन 7 लाख रुपये खंडणी केली वसुल
रक्षकच भक्षक बनला असल्याची एक धक्कादायक बाब पुन्हा उघडकीस आली असून एका पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खंडणी घेणाऱ्या पोलिसाला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कायदा आणि पोलीस यांचेच जनतेला संरक्षण आहे पण कायदा सांभाळण्याची जबाबदारी असलेले पोलीसच कायदा हातात घेतात आणि स्वत: गुन्हेगार बनतात अशा काही घटना अधूनमधून समोर येत असतात. महिला, अल्पवयीन मुली यांच्यावरील अत्याचाराच्या घटनात वाढ होत असताना अशा महिला, मुलीना पोलीस हा मोठा आधार वाटत असतो पण सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने खाकी वर्दीलाच बदनाम केले असून पोलिसांनाच पोलिसाच्या हातात बेड्या ठोकण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे आणि जनतेतून मात्र प्रचंड संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
पोलीस सेवेत असून देखील खंडणी घेणे आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्याबद्धल पोलिसाला तुरुंगात डांबण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील रहिवासी असलेल्या आणि सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या स्वप्नील विश्वास कोळी या पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार तर केलाच पण धाक दाखवून या मुलीकडून सात लाख रुपयांची खंडणी देखील उकळली असल्याचा आरोप या पोलिसावर आहे. कोळी हा ज्या पोलीस ठाण्यात सेवेत आहे त्याच पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खंडणी, लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे .आणि त्याला अटक देखील केली गेली आहे. अल्पवयीन मुलगी जेथे राहत होती त्या घरात घुसून आणि तिचा विरोध मोडीत काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा त्याने अत्याचार केले असल्याचा आरोप या पोलिसावर आहे.अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर पिडीतेकडून त्याने दोन लाख रुपये घेतले आणि पुन्हा छापा पडणार असल्याची माहिती आधीच दिल्याबाद्धाल पाच लाख रुपये त्याने घेतले.
पिडीत मुलीला एक बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून संशयित पोलीस कर्मचारी स्वप्नील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून जनतेतून मात्र संताप व्यक्त होऊ लागला आहे