"दूध भेसळ प्रकरणात पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आणखी दोन आरोपींना अटक"
प्रतिनिधी
दिनांक 16.1.2023 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाखरी गुरसाळे बांधकाम चालू असलेल्या बायपास रोडच्या उड्डाण पुलाचे जवळ संशयित दोन वाहने व तीन ईसम निलेश भोईटे, परमेश्वर काळे व गणेश गाडेकर मिळून आले होते. त्या वेळी दुधामध्ये भेसळ करण्यासाठीचे सोडियम लॉरेल ईथर सल्फेट हे जिव घेणे रसायन त्यांच्या ताब्यात मिळून आले होते. या तिघांना अटक करण्यात आली होती.
तपासा दरम्यान बारामतीहून पंढरपूर येथे रसायन भरलेले ड्रम घेऊन येणारा स्वप्नील गायकवाड वय 25 वर्षे रा. वडगांव निंबाळकर ता. बारामती यास अटक केली असून तो पोलिस कस्टडी रिमांड मध्ये आहे.
स्वप्निल गायकवाड यांच्या माहितीवरून बारामती येथे असलेल्या गोडाऊनवर छापा घातला असून सदर ठिकाणावरून आणखी काही संशयास्पद केमिकलचे ड्रम जप्त करण्यात आलेले आहेत.
तसेच बारामतीहून 14 नव्हे तर 22 ड्रम आणले होते असे स्वप्निल गायकवाड याने पोलीस तपासात सांगितले आहे. सदरचे 8 ड्रम शहाजी बहिरु ढाळे वय 38 वर्षे रा. दसुर यांना दिले असल्याचे सांगितले त्यावरून शहाजी ढाळे यांना देखील या गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून ड्रम जप्त करण्यात आलेले आहेत. शहाजी ढाळे यास मा. न्यायालयात हजर केल्यानंतर मा. न्यायालयाने दिनांक 26/1/2023 पर्यंत पोलीस मंजूर केला आहे.
सदर गुन्ह्यातील सोडियम लॉरेल ईथर सल्फेट पुरवणारा मुख्य आरोपी समीर मेहता रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती जि. पुणे हा अद्याप फरार असून तो लवकरच जेरबंद होईल.
सदर आरोपींनी मागील काळात पंढरपूर व आजूबाजूच्या तालुक्यातील डेअरीमध्ये अशा प्रकारचे दूध बनवून विकले आहे काय याचा सखोल तपास करण्यात येणार आहे.
सदर बाबत नागरिकांना अशा भेसळ दूध बनवणाऱ्या कृत्यांची माहिती किंवा सहभागी असलेल्याची माहिती असल्यास धनंजय अ. जाधव पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण कडील अधिकारी आणि अंमलदार करीत आहेत.