ताणतणाव दूर करण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक
-डॉ. अनिरुद्ध पिंपळे
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वेरीत ‘आरोग्य शिबीर’ संपन्न
पंढरपूर- ‘सध्या प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करणे गरजेचे झाले आहे. आज अथक संघर्षातून माणूस वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीपथावर पोहचला आहे. ज्ञानसाधना करत असताना विद्यार्थ्यांनी सतत आनंदी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात आपण सर्वजण वेगवेगळ्या व्यापात व्यस्त असतो त्यामुळे ताण-तणाव येत आहेत. नेहमी सकारात्मक विचार, नियमित व्यायाम व वाचनाची सवय असल्यास आपण आनंदी राहू शकतो. आपले आयुष्य आपल्यालाच जगावे लागणार आहे. यासाठी प्रत्येक क्षण कसा आनंदात घालवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. आपले जीवन हे इतरांना प्रेरीत करणारे व अनुकरणीय असावे. आम्ही सर्व डॉक्टर मंडळी डॉ. रोंगे सरांचा आदर्श घेतो आणि त्यांचे अनुकरण करतो. त्यांची साधी राहणी, विनम्रता, सतत आनंदी राहणे हे आम्हाला भावते. सतत आनंदी राहण्यासाठी प्रत्येक खेळात सहभागी व्हा, मैत्री जपा, आनंदी व आदर्श जीवन जागा, इतरांचे, चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा. एकूणच ताणतणाव दूर करण्यासाठी सकारात्मक विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सोलापूरचे बाल-माता संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे यंदाचे वर्ष हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे स्वेरी मध्ये या वर्षी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असून आज आयोजिलेल्या ‘आरोग्य तपासणी शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरुद्ध पिंपळे हे मार्गदर्शन करत होते. प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की,
‘समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्राचे खूप महत्त्व असून पंढरपुरातील डॉक्टरांमार्फत दिले जात असलेले योगदान हे खूप मोलाचे आहे त्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.’ पुढे त्यांनी स्वेरीच्या २५ वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, मिळालेले यश आणि सध्या राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम मोजक्या शब्दात मांडले व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. मानसोपचार तज्ञ डॉ. विनायक राऊत म्हणाले की, ‘बालपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या प्रवासात शारीरिक व मानसिक बदल होतच असतात. यावेळी असणारी आव्हाने, वाढती स्पर्धा यामुळे ताणतणाव येत असतात. त्यांचा परिणाम मानसिकतेवर होवून क्रोध येत असतो. त्यामुळे समस्या आल्यावर शांत राहिल्यास परिणाम सकारात्मक दिसून येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी नैराश्य, व्यसनाधीनता यापासून दूर राहावे. ताणतणाव हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते. यासाठी संपूर्ण दिवस उत्साहात राहावे. प्रथम मन नंतर अनुक्रमे मनगट व मेंदू हे मजबूत ठेवावे. तणाव निर्माण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. समस्या या प्रत्येकांना असतात, परंतु त्या समस्यांना प्रतिसाद दिला तर तो वाढतो. यासाठी नेहमी सकारात्मक विचार ठेवावे. एकविसावे शतक हे स्पर्धेचे युग आहे. संगणक ही ‘देणगी’ आहे तर येणारा ‘ताण’ हा शाप ठरत आहे. ‘मीच सतत पुढे आलो पाहिजे’ ही भूमिका आपला ताणतणाव वाढवू शकते. चिंता ही चितेचे निमित्त होऊ शकते यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, व्यसनापासून दूर राहणे, वेळेचे योग्य व्यवस्थापन व पुरेपूर झोप या बाबी आवश्यक आहेत. आजचा युवक हा सोशल मीडियाचा अतिवापर करत आहे त्यामुळे युवा पिढीसाठी ही बाब खूप त्रासदायक ठरत आहे. यासाठी सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करा तरच विद्यार्थी ताणतणाव मुक्त व उत्साही राहू शकतील. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले की, ‘स्वेरीच्या स्थापनेपासूनचा मी एक साक्षीदार असून स्वेरीतील विद्यार्थी हे खूप शिस्तप्रिय व हुशार आहेत. स्वेरीमध्ये उत्तम विद्यार्थी घडवले जातात. यासाठी स्वेरीमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आज खूप स्ट्रगल करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम आपले आरोग्य चांगले ठेवावे लागेल. स्वेरीने इंजिनिअरिंग, फार्मसी मध्ये चांगले यश मिळविले असून आता मेडिकल कॉलेज देखील काढावे.’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या शिबिराच्या माध्यमातून २० स्वतंत्र हॉलमध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नेत्ररोग, कान, घसा, स्त्री रोग, दंतरोग, एचबी, सीबीसी, रक्तगट, केस गळती, रक्तदाब, मधुमेह, त्वचा रोग, थायराईड, बॉडी चेकअप व इतर विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरात पंढरपूर पंचक्रोशीतील डॉ. संजय देशमुख, डॉ. आशिष शहापुरे, डॉ. अरुण मेनकुदळे, डॉ. ओझस देवकते, डॉ. प्रियांका जरे, डॉ. प्रतीक दोशी, डॉ. स्वाती बोधले, डॉ. मिना कांबळे, डॉ. सोनाली दोशी, डॉ. सायली भोसले, डॉ. वैशाली नाईक, डॉ. वैभव कुलकर्णी, डॉ. विनायक राऊत, डॉ.अजित जाधव, डॉ. सौरव ठवरे, डॉ. अमित पावले, डॉ. सीमा इंगोले, डॉ. संजय कांबळे, डॉ. अमित मेनकुदळे, डॉ.अरुण सर्वगोड, डॉ. हेमा दातार व इतर वैद्यकीय डॉक्टरांनी व परिचारिका यांनी सहभाग घेवून शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविकेमधील सुमारे १३०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात काही विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार केले तर काहींना पुढील तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिबिराला आमंत्रित केल्याबद्धल सर्व डॉक्टरांच्या वतीने सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचा तर येथील स्वेरीचे तंत्रज्ञान राजस्थान या राज्यामध्ये नेल्यामुळे डॉ.मेनकुदळे परिवाराच्या वतीने युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुधीर भातलवंडे, डॉ. पुरुषोत्तम कदम, एजाज बागवान, किशोर कवडे, डॉ. उमेश शिंगटे, कांता काटे, सचिन कोळी, सुहास सरगर, अहिरे, गणेश गवळी, सौरव मोरे, अक्षय निकम आदी डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी, पश्चिम महाराष्ट्र शिक्षक-पालक संघाचे आबासाहेब दैठणकर तसेच स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम. बागल, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर या शिबिराच्या आरोग्य समन्वयिका डॉ.सौ. स्नेहा रोंगे यांनी आभार मानले.