राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे
-सचिव डॉ.बी.पी.रोंगे
मुंढेवाडी मध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे ‘विशेष श्रम संस्कार शिबीर’ संपन्न
पंढरपूर– ‘आज संपूर्ण जगामध्ये एकमेव तरुण देश म्हणून ज्या देशाकडे पाहिले जाते तो आपला भारत देश आहे. कारण आज भारतामध्ये युवकांची संख्या ही सर्वात जास्त आहे. या युवकांच्या शक्तीमुळेच आज भारत देश घडत आहे. राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचे खूप मोठे योगदान असून यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची सुरुवात ही ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या माध्यमातून विद्यार्थी दशेत असताना होत असते. मुंढेवाडी या गावाला वेगवेगळे पुरस्कार मिळण्याची कारणे म्हणजे या गावात असलेली नागरिकांमधील ‘एकी’, संपूर्ण गावांमध्ये असलेली साक्षरता, गावच्या विकासामध्ये युवकांचे असलेले भरीव योगदान ही आहेत. त्यामुळे या विशेष शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराचे धडे घेऊन आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग हा आपल्या गावाच्या विकासासाठी करावा. एकूणच राष्ट्राच्या उभाणीत युवकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.’ असे प्रतिपादन ‘स्वेरी’चे संस्थापक सचिव तथा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंढेवाडी (ता. पंढरपूर) येथे दि. २७ डिसेंबर २०२२ ते ०२ जानेवारी २०२३ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 'विशेष परिश्रम व संस्कारात्मक' स्वरुपाच्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
समारोप प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र डुबल गुरुजी यांनी या शिबिराचे विशेष कौतुक करताना ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या या कलागुणांचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा.’ असे मत व्यक्त केले. प्रास्तविकात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती यांनी या तब्बल आठवडाभर चाललेल्या ‘विशेष श्रम संस्कार शिबिरा’ची सविस्तर माहिती दिली. या शिबिरात दररोज सकाळी ९ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध उपक्रम राबविले गेले. या दरम्यान काही विद्यार्थी रात्री मुंढेवाडीमध्येच राहून विविध विषयांवर जनजागृती करत होते. योगासने, सूर्यनमस्कार, श्रमदान, चर्चासत्र, प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच बालविवाह निर्मूलन, आरोग्य, आजार, स्वच्छता यावर मार्गदर्शन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, ग्राम स्वच्छतेचे महत्व, मुली वाचवा देश वाचवा, प्लास्टिकबंदी, पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक प्रबोधन, शिक्षणाची गरज व महत्व, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता संबंधित मार्गदर्शनपर विविध कार्यक्रम व ग्रामस्वच्छता विषयक विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रप्रमुख नवनाथ मोरे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना लोकगीतांतून समाजाचे परिवर्तनाबाबतचे मार्गदर्शन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने तसेच रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती, डॉ. श्रीकृष्ण भोसले, प्रा. रविकांत साठे व यांच्या नेतृत्वाखाली, अभियांत्रिकीतील रासेयोचे १४५ पेक्षा जास्त विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमासाठी मुंढेवाडी ग्रामस्थांनी देखील खूप सहकार्य केले. यावेळी सरपंच हनुमंत घाडगे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण मोरे, भालचंद्र (भाऊ) मोरे, पोलीस पाटील शरद मोरे , तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन मोरे, दत्तात्रय मोरे, माजी सरपंच भास्कर मोरे, ह.भ.प.नवनाथ मोरे गुरुजी, स्वेरीच्या रासेयोचे सल्लागार डॉ.रंगनाथ हरिदास, प्रा. सचिन गवळी, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. जी.जी.फलमारी, प्रा. एस.बी. खडके, प्रा. टी.डी. गोडसे, प्रा. वैभव झांबरे, प्रा. वृषाली गोरे आदी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. तर रासेयोचे विद्यार्थी समन्वयक आदित्य गोखले यांनी आभार मानले.