स्वेरीचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम कौतुकास्पद
-सौ वंदना पंडित
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वेरीत ‘रंगसंवाद २०२३’ संपन्न
पंढरपूर- ‘रंगसंवाद २०२३’ या कार्यक्रमामुळे आमच्या लहान मुलांच्या चित्रकलेला स्वेरीने उत्तम व्यासपीठ दिले. यामुळे आमची मुले उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाली. स्पर्धा आहे हे माहित झाल्यापासून मुले चित्रकलेचा सराव करू लागली. खरंच, स्वेरीचे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. आज आयोजित केलेल्या उपक्रमातून मोठ्या मुलांबरोबरच लहान मुलांना देखील हसतखेळत मार्गदर्शन केले जाते हे समजले. आमच्या मुलांच्या कलेला स्वेरीने वाव दिला यामुळे आम्हा सर्व पालकांतर्फे डॉ. रोंगे सरांचे व स्वेरीचे आभार मानतो. आम्ही ‘स्वेरी’ हे नाव ऐकून होतो परंतु आज आम्हाला स्वेरीचे नियोजन काय असते, याची प्रचिती आली. संपूर्ण कॅम्पसमध्ये आम्ही पालक वर्ग फिरत असताना स्वेरीचे प्राध्यापक, प्राध्यापिका मुलांच्या स्वागतापासून ते चित्रकला संपेपर्यंत संपूर्ण काळजी घेत होते. चित्रकला स्पर्धेसाठी जेंव्हा स्वेरीत आलो त्यावेळी आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आल्याचा भास झाला. कारण आम्हाला इथे मुलांना सांभाळताना अजिबात अडचण आली नाही परंतु या ठिकाणी मुलांबरोबर मुलींची देखील अत्यंत उत्तम पद्धतीने काळजी घेतली जात असल्याचे जाणवले.’ असे प्रतिपादन सुस्ते (पंढरपूर) येथील अंगणवाडीच्या संचालिका सौ. वंदना गजानन पंडित यांनी केले.
स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वेरीमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून छोट्या गटापासून ते पदव्युत्तर पदवी मधील विद्यार्थ्यांसाठी एकूण ७ गटामध्ये ‘रंगसंवाद-२०२३’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये महिला पालक प्रतिनिधी व उदघाटक म्हणून सौ.वंदना पंडित ह्या बोलत होत्या. शिक्षक प्रतिनिधी म्हणून कवठेकर प्रशालेचे शिक्षक सुनील रुपनर हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले की, ‘स्वेरीचे यंदाचे २०२२-२३ हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे संस्थेच्या सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार व संमतीने संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून आज ही चित्रकला स्पर्धा ‘रंगसंवाद २०२३' चे आयोजन केले आहे.’ पुढे बोलताना त्यांनी स्वेरीच्या २५ वर्षातील वाटचालीतील विविध टप्पे सांगितले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून स्वेरीत बालचमूंचे व त्यांच्या पालकांचे आगमन होत होते. प्रत्येक स्पर्धकांना त्यांच्या नियोजित गटातील हॉलकडे प्राध्यापकवर्ग स्वतः नेऊन सोडत होते. सर्वांसाठी चहा, पाणी, अल्पोपहाराची सोय देखील केली होती. चित्रकला स्पर्धा संपल्यानंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थी सेल्फी काढत होते.
स्वेरी कॅम्पस आज विद्यार्थी कलाकारांनी भरला होता. स्पर्धकांच्या स्वागतापासून ते घरी परतेपर्यंत, तसेच सहभागी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र हाती देईपर्यंत संपूर्ण व्यवस्था उत्तम पद्धतीने पार पडली. ‘रंगसंवाद २०२३’ या चित्रकला स्पर्धेत ७ गटात एकूण ११६८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या ठिकाणी सर्व हॉल मध्ये स्वतः सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सर व स्वेरीचे पदाधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांना कलेसाठी प्रेरणा देत होते. यावेळी स्पर्धकांबरोबर आलेल्या पालकांमुळे स्वेरी कॅम्पसला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी स्वेरीच्या विश्वस्त व गुरसाळे येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सौ. प्रेमलता रोंगे, बाळासाहेब रुपनर, नागनाथ विद्यालयाचे चेअरमन तुकाराम जगताप, भारत इंगळे, विठाई पथसंस्थेचे चेअरमन पाटील, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, विश्वस्त बी.डी रोंगे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.यशपाल खेडकर, प्रा.उत्तम अनुसे, डॉ.सतिश लेंडवे, प्रा. बी.डी. गायकवाड, प्रा.पी.बी.आसबे, प्रा.मनोज देशमुख यांनी व स्वेरीच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी या चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.