श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मकरसंक्रांत सण उत्साहात साजरा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज रविवार दि१५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.या दिवशी हजारो सुवासिनी या श्री रुक्मिणी मंदिरात देवीस वाणवसा करण्यासाठी येत असतात,ही परंपरा शेकडो वर्षांपासून आहे. श्री रुक्मिणी देवीस वाण देऊन हळदी कुंकू करण्यासाठी पंढरपूर शहरच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो सुवासिनी येत असतात.
त्याप्रमाणे यंदाही प्रचंड गर्दी झाली होती. अगदी पहाटे पाच वाजल्यापासून सुवासिनी रांगेत उभे होत्या,हा सण महिलांचा असल्याने यावर्षी पुरुष भक्तांनी केवळ मुखदर्शन घ्यावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आले होते, दर्शन बारी सारडा भवन येथून सुरू होती, श्री रुक्मिणी ओवरी तसेच बाजीराव पडसाळी येथे अनेक सुवासिनींनी पान सुपारी, तिळगुळ देवाण घेवाण करून हळदी कुंकू केले,
खास मकरसंक्रांत निमित्त विविध पाने,फुले व भाज्यानी गाभारा सजविण्यात आला होता, दोडका, भोपळा, फ्लॉवर,कोबी, मुळा,गाजर, घोसावळे, पडवळ आदी फळभाज्या लावून सुंदर सजावट करण्यात आली होती.