पंढरपूर अर्बन बँक निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे सर्व अर्ज अवैध
पांडुरंग परिवाराने केला जल्लोष
पंढरपूर-(प्रतिनिधी) दि पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी समविचारी गटाचे सर्व अठरा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक पी.सी.दुरगुडे यांनी दिली. या निर्णयानंतर सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतिषबाजी केली.
पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापन करून याव्दारे सर्व सतरा जागेसाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीची प्रक्रीया पूर्ण झाली व यावर आज गुरूवारी सकाळी निर्णय देण्यात आला. सहायक निबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये केवळ सत्ताधारी गटातील अठरा उमेदवारांची नावे होती. निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक असणारी प्रक्रीया विरोधी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी पूर्ण केली नसल्याने सदर अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये उमेदवाराची पंढरपूर अर्बन बँकेत एक लाख रूपयाची ठेव असावी, तीस हजार रूपयाचे भागभांडवल असावे, उमेदवारासह सूचक अनुमोदक बँकेचे थकबाकीदार नसावेत आदी नियम आहेत. पुरेसे भागभांडवल नसल्याने बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले असल्याचे सहायक निबंधक दुरगुडे यांनी सांगितले.
दरम्यान विरोधी गटाचे सर्वच अर्ज बाद ठरल्याची माहिती मिळताच पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांना हार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच ङ्गटाक्याच्या अतिषबाजीमध्ये व हालग्याच्या साथीने चौफाळा ते महाव्दार चौक मार्गे परिचारक यांच्या वाड्या पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी सर्व उमेदवारांचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सत्कार करण्यात आला. शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गर्दी करून परिचारक यांचे अभिनंदन केले.
निवडणुकीच्या प्रक्रीये नुसार दि.१२ जानेवारी पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असून सत्ताधारी गटातील एक उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार आहे. यानंतरच अधिकृतपणे बिनविरोध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रशांत परिचारक यांनी, शंभर वर्षाहून अधिक जुन्या असणार्या या बँकेचे जवळपास पन्नास हजार सभासद आहेत. बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेकडो सभासदांनी आमच्यावर विश्वास असल्याचे वेळोवेळी भेटून सांगितले होते. बँक ही एक आर्थिक संस्था असून निवडणुकीचा आखाडा नाही. यामुळे वित्तीय संस्थेवर आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी हजारो ठेवीदार, कर्जदार यांचा विचार करणे गरजचे आहे असे मत व्यक्त केले. कोणत्याही तक्रारी असतील किंवा सूचना असतील तर आमच्याशी संपर्क साधावा त्या चर्चेने सोडवू. मात्र बिनबुडाचे आरोप करून संस्था बदनाम करू नका असे आवाहन केले. ही संस्था आणखी दोनशे, तीनशे वर्ष टिकली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
वैध उमेदवार
प्रशांत परिचारक, राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, मनोज सुरवसे, शांताराम कुलकर्णी, अनिल अभंगराव, ऋषिकेश उत्पात, विनायक हरिदास, अनंत कटप, अभिजीत मांगले, गणेश शिंगण, गजेंद्र माने, राजेंद्र कौलवार, माधुरी जोशी व डॉ.संगिता पाटील