छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आता थेट न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. कोश्यारींविरोधात महाभियोग चालवण्यात यावा अशी मागणी याचिकाकार्त्याने केली आहे. या याचिकेमध्ये राज्यपालांनी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी विधान केल्याचाही दावा करण्यात आला आहे.भारतीय राज्यघटनेनुसार, उच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी आणि अनुच्छेद ६१ आणि १५६ अन्वये राज्यपालांना हटवण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्य विधानमंडलाच्या अध्यक्षांना घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमधून राज्यपाल कोश्यारी देशातील शांतता, सुरक्षा आणि एकतेला बाधा ठरत असल्याचं या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सिद्ध झालं तर त्याच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात यावा. ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात तर कधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं करतात. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी जगदेव यांनी केली आहे.