अखेर बच्चू कडू यांनी घेतला हा निर्णय;
भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यावर प्रचंड नाराज असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राणा यांची तक्रार केली होती. कडू यांनी खोके घेतल्याचे वक्तव्य राणा यांनी केले होते. त्यावर कडू यांनी आक्षेप घेत वेगळी वाट धरण्याचे संकेत दिले होते. आता कडून यांनी म्हटले आहे की, माझ्यासाठी कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्त्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन उद्या भूमिका स्पष्ट करणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच ते शिंदे यांच्यासोबत सूरत आणि गुवाहाटी येथे राहिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू हे मंत्री होते. त्यांना आता मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यातच राणांनी आरोप केल्याने त्यात भर पडल्याचे बोलले जाते. आता कडू हे उद्या काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागणार आहे. जे आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना लवकरच मंत्रिपदाचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे नऊ आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. पुढील मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी इच्छुकांना दिला होता. मात्र, ऑक्टोबर महिना संपला तरी हा विस्तार झाला नाही. यावर विरोधकांनीही टीका केली होती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर अनेक आमदार सोडून जातील. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर आमदार उद्धव ठाकरेंकडे निघून जातील. त्यामुळे संख्याबळ कमी होईल अशी भीती सरकारला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच विस्तार करू असे म्हटले. पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तरच ती खरी मानली जाते, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने काही आमदारांमध्ये नाराजी पसरली होती. अशा आमदारांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये बच्चू कडू यांचादेखील समावेश असेल. कडू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, कडू यांची ही नाराजी येत्या दोन दिवसात दूर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी अयोध्येचा दौरा केला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जात होते. यावर त्यांनीही शिक्कामोर्तब केले असून, लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.