अर्भकाला बेवारस सोडण्याची ५ वर्षात ११ प्रकरणे तर चालू वर्षात ४ प्रकरणांची नोंद! बाल हक्क संरक्षण आयोग - गोवा
अर्भकाला बेवारस सोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा सरकारचे महिला आणि बाल कल्याण खाते, आरोग्य खाते अन् पोलीस खाते यांच्यासाठी 'ॲडवायझरी' प्रसिद्ध केली आहे. अर्भकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाने म्हटले आहे, ''अर्भकाला असुरक्षित ठिकाणी बेवारस सोडण्याचे प्रकार वाढत आहेत. ३ अर्भके कचरा टाकण्याच्या ठिकाणी ठेवल्याने त्यांना कुत्रे चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. कायद्याविषयी अज्ञान असल्याने अशा घटना वाढत आहेत. बेवारस अर्भकाची काळजी घेण्यासाठी दत्तक घेणार्या संस्थेची नेमणूक करणे, तसेच अशा घटना टाळण्यासाठी संबंधित पालकांमध्ये जागृती करणे आणि याविषयी त्यांना संवेदनशील बनवणे यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी जागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे आदी उपाययोजना महिला आणि बाल कल्याण खात्याने करणे आवश्यक आहे. अर्भकाला बेवारस सोडल्याच्या प्रकरणी अन्वेषण चालू असतांना पोलिसांनी कोणत्याही 'बायलॉजिकल पॅरेंट्स'च्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवू नये.