तीन अपत्य असल्याच्या कारणावरून पुरंदर तालुक्यातील तत्कालीन संचालक संदीप जगदाळे यांचा दूध उत्पादक संघाची उमेदवारी अर्ज बाद झाला होता. जगदाळे यांना तीन अपत्य आहेत, असा बनावट दाखला भोर तालुक्यातील जोगवडी येथील ग्रामसेवकाने दिला होता, या प्रकरणाची जिल्हा परिषदेने चौकशी केली.
यात संबंधित दाखला भोगस असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जोगवडीचे ग्रामसेवक अशोक दंडवते यांना निलंबित केले. सारखे नाव असल्याचा फायदा घेत, ग्रामसेवक दंडवते यांनी दाखल्याच्या नोंदीत खाडाखोड आणि फेरफार करून सदोष दाखला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामसेवकाने दाखल्यात केलेल्या कसुरामुळे जिल्हा दूध संघाचे तत्कालीन संचालक संदीप जगदाळे हे निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अपात्र ठरले होते. यामुळे या निवडणूकीतील निर्णय अधिकाऱ्यांनी जगदाळे यांचे विरोधक मारुती जगताप यांना बिनविरोध विजयी घोषित केले होते.
जगदाळे यांना तीन अपत्य आहेत, हा मुद्दा उपस्थित करून, मारुती जगताप यांनी याबाबतचा पुरावा म्हणून ग्रामसेवक यांनी दिलेला तीन अपत्याबाबतचा दाखला सादर केला होता. आता मात्र हाच दाखला बनावट असल्याचे आणि कागदपत्रात खाडाखोड करून तयार केला असल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीतून उघड झाले आहे.
निलंबिनाची कारवाई झालेल्या ग्रामसेवक अशोक दंडवते यांनी पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने दाखला दिला आहे. ग्रामपंचायतीच्या दस्ताऐवजामध्ये फेरफार करण्यात आले. यामुळेच त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे, असे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खरंतर माझा आणि जोगवडी या गावचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध येत नाही. जोगवडी माझी सासुरवाडीही नाही. तरीही तेथील ग्रामसेवकाने माझा चुकीचा दाखला देण्याचा संबंध काय येतो? हा दाखला जाणीवपूर्वक, दबाव देवून द्यायला लावलेला आहे. या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संदीप जगदाळे यांनी प्रतिक्रिया देताना केली आहे.