पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठीचा निधी वेळेत खर्च करा- पालकमंत्री शंभूराज देसाई
प्रतिनिधी सातारा : जिल्ह्यातील पर्यटन व क वर्ग धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबर कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोयना नगर येथील पर्यटन विकासाची जी कामे मंजूर आहेत ती लवकरात लवकर सुरु करावी. तसेच तापोळा ता. महाबळेश्वर येथील मंजुर कामेही तातडीने सुरु करावीत. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामेही वेळेत पूर्ण करावीत. ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे. विकास कामांमध्ये काही अडचणी येत असल्यास तात्काळ सांगाव्यात त्याही सोडविल्या जातील असेही श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.
बहुउद्देशीय कृषी संशोधन केंदाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा
शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचवावेल यासाठी पाटण तालुक्यातील काळोली येथे बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राची निर्मिती करावयाची आहे. याचा तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या
बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कृष्णा, कोयना नदी काठी शेतकरी कोणती पिके घेतात याचा अभ्यास करावा. बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद विविध पिकांचे संशोधन, शेतमाल प्रक्रिया, पॅकिंग, ग्रेडिग व विक्री व्यवस्था, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयावरील प्रशिक्षण, कृषी विस्तार विषयक विविध प्रशिक्षण यासह अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सातारा नगर पालिका हद्दीतील विविध विकास कामांचा आढावा
पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा नगर पालिका हद्दीतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. सातारा नगर पालिकेकडून अंतर्गत रस्ते, भुयारी गटारे यासह अन्य विकासकामे वेळेत गुणवत्तेसह पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठकही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.