डिसेंबरपर्यंत सर्व निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे जानेवारीत सातारा पालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण, त्या आधीच सातऱ्यात दोन राजांचा पालिकेवरून कलगीतूरा रंगला आहे. दाोन्ही नेते एकमेकांच्या आघाड्यांवर सडकून टीका करू लागले आहेत. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप कमळ चिन्हावर सातारा पालिकेची निवडणूक लढेल, तसेच दोन्ही राजेंना त्यासाठी एकत्र आणले जाईल, असे मत व्यक्त केले होते.
पण, दोन राजांतील पालिकेतील कारभारावरून सुरू असलेला कलगीतूरा संपेना झाला आहे. उलट शांत झालेल्या या वादात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी ठिणगी टाकून पुन्हा पेटवला आहे. हा वाद पुन्हा पेटलेला असतानाच राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा पालिकेत महाविकास आघाडीचे पॅनेल करण्याची सूचना जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना केली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना असे एकत्रित महाविकास आघाडीचे पॅनेल सातारा पालिकेच्या निवडणूकीत पहायला मिळणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून पॅनेलची बांधणी करणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजेंची नगर विकास आघाडी यांच्यापुढे महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.
आजपर्यंत सातारा पालिकेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीच यशस्वी झालेला नाही. पण, यावेळेस महाविकास आघाडी भाजपच्या दोन्ही राजेंना धक्का देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा पालिकेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ऐनवेळी भाजपकडून दोन्ही राजेंना एकत्र आणण्याचा प्रयोग करण्याची शक्यता आहे.
सातारा पालिका निवडणूकीत महाविकासचा फॉर्मूला; राष्ट्रवादी ताकदीने उतरणार : शशिकांत शिंदे