स्वेरीच्या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षातून मिळणार योग्य दिशा व अचूक माहिती
-प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील
स्वेरीत ‘पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ उदघाटन
पंढरपूर- 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती व कार्यक्षमता असते परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता असते, या गोष्टीचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी या मार्गदर्शन कक्षाची स्थापना केली आहे.’ असे प्रतिपादन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष (पदवी), पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी व एम.सी.ए या कोर्सेसच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये नुकतीच अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या मार्गदर्शन कक्षाचे उदघाटन जेष्ठ विचारवंत प्रा.ज्ञानेश्वर (माऊली) जाधव, शिवणे उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.विजयकुमार वाघमोडे व अण्णासाहेब पाटील उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आबासाहेब सलगर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांना स्वेरीच्या ‘मार्गदर्शन कक्षात कोणती माहिती मिळेल’ याबाबत प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील हे उपस्थितांना माहिती देत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बी.पी. रोंगे सरांनी १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत असताना प्रत्येक वर्षी स्वेरीच्या यशाचा आलेख वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए व एमसीए या विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच शैक्षणिक शुल्क, शासनाच्या विविध स्कॉलरशीप्स, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह सुविधा, कमवा व शिका योजना आदींबाबत चर्चा व मार्गदर्शन होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांना अचूक माहिती मिळावी व कोणत्याही विभागातून उत्तम करिअर करता यावे यासाठी या मार्गदर्शन केंद्रात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी ९.३० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत सज्ज असणार आहे. यामुळे एकाच छताखाली सर्व अचूक माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांची आवड/क्षमता, पालकांची निवड आणि प्राध्यापकांशी असणारा समन्वय/संपर्क या बाबी या प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या आहेत. स्वेरीतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व पालकांना निश्चित पणे योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणार आहे. स्वेरी संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करून नेमक्या कोणत्या महत्वाच्या बाबी पहाव्यात? कॅप राउंडस्, कॅम्पस प्लेसमेंट, ब्रँच निवड, मागील वर्षाचे विविध विभागांचे कट ऑफ मार्क्स या व इतर गोष्टींबाबत विद्यार्थी व पालक यांना योग्य व खात्रीशीर मार्गदर्शन मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी असल्यास अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कक्षाच्या उदघाटन प्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, प्रवेश प्रकियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Tags
Top news