महिलांच्या बॉक्सिंगमध्ये ४५ ते ४८ या वयोगटात नितू घनघस हिने जबरदस्त कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या या यशानंतर देशभरात उत्साहाची आणि आनंदाची एकच लाट उसळली. यानंतर जेव्हा तिने मनोगत व्यक्त केले तेव्हा तिने तिच्या या यशाचे श्रेय समस्त देशबांधवांना आणि तिचे वडील जयभगवान यांना दिले. वडिलांबद्दल बोलण्याआधी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि त्यानंतर हे सुवर्णपदक जिंकण्यासाठी वडिलांनी तिला किती आणि कशी साथ दिली हे तिने सगळ्या जगासमोर सांगितले.
नितू हरियाणातल्या भिवनी जिल्ह्यातील धनाना या गावची. घरची परिस्थिती अगदीच बेताची. २००८ साली भिवनीचे बॉक्सर विजेंद्र यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि तिथूनच नितूआणि तिचे पालक बॉक्सिंगकडे आकर्षित झाले. बॉक्सिंग हा पुरुषप्रधान खेळ असूनही एका लहान गावातल्या पालकांनी तिला दिलेली साथ उल्लेखनिय ठरते. हा खेळ खेळायचा म्हणजे नितूचा आहार विशेष हवा. तब्येत कमावण्यासाठी तिला दूध- तूप- दही- लोणी अशा खुराकाची आवश्यकता होती. आपल्या लेकीला हे सगळं भरपूर प्रमाणात मिळावं, यासाठी तिच्या पालकांनी चक्क कर्ज काढून अतिशय उत्तम जातीची अडीच लाखांची म्हैसच लेकीसाठी विकत घेतली.
एवढंच नाही तर नितूला जेव्हा गरज पडेल तेव्हा तिच्यासाठी आपल्याला उपलब्ध राहता यावं, यासाठी नितूच्या वडिलांनी तब्बल ३ वर्षे बिनपगारी रजाही टाकली होती. म्हणूनच तर वडिलांबाबत बोलताना नितू म्हणाली की त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे कधीच मोजता येणार नाही. स्वत: खूप कष्ट घेतले आणि मला माझ्या खेळाच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट उत्तमातली उत्तम कशी मिळेल, याची काळजी घेतली..त्याच तर कष्टांचं आणि नितूच्या जिद्दीचं फळ आहे तिचं सुवर्णपदक.