नागपूर विभागातील ३३ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काहीशा विश्रांतीनंतर विदर्भातील पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम असून तब्बल २५ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर २३४५ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेल्या पावसाचा देखील परिणाम गडचिरोली येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यामध्ये झाला आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १७ गेट उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
तुफान पर्जन्यवृष्टीनंतर दोन दिवस खंड दिलेल्या पावसाने नांदेडमध्ये पुन्हा संततधार सुरू केली आहे. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापासून पावसाने उघडीत दिल्याने शेतकरी शेतात जमा झालेले पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते. तर अनेक शेतकरी तणनाशक फवारणीच्या कामाला लागले होते. अशावेळी रविवारी दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. मध्यरात्री जोरदार झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत सुरुच होता. कोकण, मध्य महाराष्ट्रातही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू झाला होता.