अक्षयतृतियेला होणारे बालविवाह रोखा
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश
सोलापूर,दि.28 : अक्षयतृतीया हा सण 3 मे 2022 रोजी आहे. यादिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, याबाबत संबंधितांनी दक्षता घेऊन बालविवाह रोखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष आणि पोलीस विभाग यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून जिल्ह्यामध्ये बालविवाह होणार नाहीत, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले आहे.
ज्या ठिकाणी बालविवाह होणार आहे, त्याबाबत संबंधितांनी गावातील ग्रामसेवक, पोलीस विभाग किवा चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी दिली.