अभियांत्रिकीच्या शिक्षणात कोणतीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य असते प्रा.श्याम माळी
स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा
पंढरपूर- ‘शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रामन यांच्या संशोधन कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वाटचाल करण्याची सध्या गरज आहे. यासाठी आपल्या देशाची अर्थव्यवस्थाही खुली आहे. सध्या जागतिकीकरणाचे वारे प्रचंड वेगाने वाहत आहे. या जागतिकीकरणामध्ये तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाबरोबरच नवीन व सुधारित कौशल्ये आत्मसात करावीत, हीच सध्या काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही समस्या बौद्धिक पातळीवर सोडविण्याचे जबरदस्त कौशल्य दिसून येत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्र निवडल्यास उद्योजक, शेतकरी या व अशा अनेक समाज घटकांच्या समस्या सहजपणे सोडवतील व यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.’ असे प्रतिपादन वाखरी (ता.पंढरपूर) येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्रा.श्याम माळी यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.श्याम माळी मार्गदर्शन करत होते. त्यांनी नोबेल पारितोषक विजेते शास्त्रज्ञ डॉ.सी व्ही रामन यांचे संशोधन कार्य आणि गणितातील सूत्रे विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडली. सदरचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. पुढे बोलताना प्रा.श्याम माळी यांनी गोपाळपूरच्या माळरानावरील शैक्षणिक नंदनवन म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात स्वेरीचे कार्य अनुकरणीय असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात जवळपास २५० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकृष्ण भोसले यांनी केले तर प्रा. पोपट आसबे यांनी आभार मानले.