स्वेरीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

0
कुसुमाग्रजांच्या साहित्यामुळे आत्मविश्वासाबरोबरच उर्जा मिळते प्रा. यशपाल खेडकर

स्वेरीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

पंढरपूर- ‘कुसुमाग्रजांनी आपल्या विपुल साहित्याच्या माध्यमातून नव साहित्यिकांना प्रचंड आत्मविश्वास आणि साहित्य निर्मितीसाठी  उर्जा देण्याचे अदभूत कार्य केले. यामुळेच आज महाराष्ट्रातील विविध प्रांतात मराठी साहित्यांची निर्मिती होत आहे. आज मराठी भाषेचा प्रवास अजूनही फुलत असल्याचे दिसून येते. आज मातृभाषा मराठी असली तरी इतर भाषा जाणून घेतल्यामुळे मराठी भाषेला विसरता येणे शक्य नाही. जोपर्यंत मराठी भाषा बोलणारा शेवटचा माणूस संपत नाही तोपर्यंत तरी मराठी भाषेला अंत नाही हे मात्र नक्की.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रा. यशपाल खेडकर यांनी केले. 
         मराठी साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या ११० व्या जयंती निमित्त स्वेरीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील प्रा. यशपाल खेडकर हे ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी’ या विषयावर कुसुमाग्रजांच्या साहित्यावर प्रकाश टाकत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ हे होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. खेडकर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्रा. खेडकर म्हणाले की, ‘मराठी साहित्य क्षेत्रात गावपातळीवर व देशपातळीवर असलेल्या एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये ही महाराष्ट्रात आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक भाषेला मराठी भाषेचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे भारतात मराठी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असल्याचे समजते. यासाठी मराठी भाषेचा विसर पडू न देता त्या भाषेवर प्रेम करा, मराठीच्या वाचनाचा व्यासंग वाढवा, मतप्रवाह वेगवेगळे असतील त्यात वाद ऐवजी संवाद घडले पाहिजेत. मातृभाषेवर आपण श्रद्धा ठेवतो. यावेळी एकीकडे मातृभाषा आली कि दुसरीकडे इंग्रजी भाषेची गरज असते. मराठीचा आग्रह धरून इंग्रजीकडे दुर्लक्ष होऊ नये. दुसरी भाषा शिकल्याने आपल्या मातृभाषेवर कोणताही परिणाम होत नाही. यासाठी मराठी भाषेचे जतन केले पाहिजे.’ असे सांगून प्रा.खेडकर यांनी लीळाचरित्र पासून ते अलीकडील साहित्य रचनेवर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात त्यांनी नामदेव ढसाळ, दया पवार, बहिणाबाई चौधरी, ज्ञानोबा उत्पात, लक्ष्मण माने, विजय तेंडुलकर यांच्या सारख्या अनेक साहित्यिकांच्या साहित्याची उदाहरणे देवून ‘कुसुमाग्रज हे साहित्यिकांना ऊर्जा देणारे कवी होते. त्यांच्या  साहित्यातून माणुसकीचा संदेश मिळतो. एकूणच वि. वा. शिरवाडकर यांची इतरांहून वेगळी साहित्यसंपदा होती. त्यांच्या साहित्यातून हरहुन्नरी, व्यासंगी, प्रतिभावंत, असे विविध पैलू आढळतात.’ असे सांगून बखर, शकावली, श्लोक, शिवचरित्र, पोवाडा, पासून कविता, लावणी, पोवाडा या साहित्य प्रकारांबद्दल सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ म्हणाले की, ‘आजपर्यंत प्रा. यशपाल खेडकर यांना सूत्रसंचालनाच्या रूपातच पाहिलो होतो परंतु आज ते एक उत्तम व्याख्याते म्हणून आम्हाला पाहण्याचा योग लाभला. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये असलेल्या साहित्य संपदेची सविस्तर माहिती मिळाली. मराठी भाषेत सुंदर सुंदर असे काव्य वाचन, भारुड आदी साहित्य संपदा आढळते. मराठी भाषा जपत असताना आता ती अधिक प्रगल्भ होत असताना दिसते. प्रा खेडकर यांनी मराठी साहित्यसंपदा सांगताना विविध प्रांतांमध्ये, विविध भागांमध्ये असणाऱ्या मराठी भाषेचा आणि त्याचा अपभ्रंश झाल्यावर बदललेली मराठी भाषा याचा सुंदर विवेचन करून वैचारिक प्रबोधनातून जबाबदारीची जाणीव करून दिली.’ यावेळी बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे या ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद लुटला. सूत्रसंचालन प्रा. नीता कुलकर्णी यांनी केले तर अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !