शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी
पंढरपूर: दि.२६- “नव्या-तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात वाढविल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सुलभ व परिणामकारक होते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. नव्या-तंत्रज्ञानाच्या वापराने अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते. केवळ व्याख्यान पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना अध्यापनात रुची निर्माण होत नाही. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया ही रटाळ आणि कंटाळवाणी होते. सध्याची शिक्षण पद्धती ही पाहून शिकण्याची असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण पूरक साधनांचा पुरवठा करावा.” असे मत एज्युटेक कॉर्पोरेशन, अहमदनगर येथील श्री. भूषण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात महाविद्यालयीन प्राध्यापकासाठी आयोजित ‘अध्यापन प्रक्रियते नव-तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावरील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. भूषण कुलकर्णी बोलत होते. त्यांनी प्रथम सत्रामध्ये ओबीएस स्टुडीओचा वापर करून संगणकाच्या मदतीने स्वतःचे लेक्चर रेकोर्ड करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिराच्या द्वितीय सत्रामध्ये महाविद्यालयातील शिक्षकांनी स्वतःचे लेक्चर रेकोर्ड करून घेतले. तिसऱ्या सत्रामध्ये अध्यापन प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले. एज्युटेक कॉर्पोरेशन, अहमदनगर येथील एकनाथ कोरे यांनी सर्व तांत्रिक बाबींचे सादरीकरण केले.
या प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी बजावणी करताना दूरस्थ शिक्षणासाठी या प्रक्रियेचा व रेकोर्ड केलेल्या लेक्चरचा कशा पद्ध्तीने वापर करावा यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिरातून तयार होणारे सर्व लेक्चर लवकरच महाविद्यालयाच्या एल. एम. एस. वर उपलब्ध होतील व विद्यार्थ्यांना ते केंव्हाही वापरता येतील असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. भगवान नाईकनवरे, प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत, प्रा. राजेश कवडे, प्रा. डॉ. तुकाराम अनंतकवळस, नॅक समन्वयक डॉ. अमर कांबळे, नॅक सहसमन्वयक डॉ. समाधान माने, रुसा समन्वयक प्रा. योगेश पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. समाधान माने यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक बहुसंखेने उपस्थित होते.