"गुरूवीण नाही दुजा आधार....."
सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप
सोलापूर : प्रतिनिधी
'सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ' च्या जयघोषात सम्राट चौक येथील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात रविवारी गुरूपौर्णिमा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३०० किलो फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती.
गुरुपौर्णिमेनिमित्त चाललेल्या गुरुगीता सप्ताहाची समाप्ती रविवारी सकाळी नऊ वाजता झाली. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या गुरुपादुकांचे पूजन दिगंबर जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आले. तसेच सौ. वनिता व श्री. मोहनराव बोड्डू यांच्या शुभहस्ते श्री सद्गुरूंच्या चरणपादुकांवर रुद्राभिषेक करण्यात आला.
यानंतर दुपारी १२ वाजता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराजांची महाआरती झाली. यावेळी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी लेखिका विजयालक्ष्मी शिरगांवकर (पुणे) यांचे 'गुरु महिमा' या विषयावर प्रवचन झाले. शिष्याच्या जीवनातली गुरूंचे स्थान आणि महत्व लेखिका विजयालक्ष्मी शिरगांवकर यांनी विषद केले. यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत झालेल्या सांप्रदायिक भजनात भाविक तल्लीन झाले. रविवारी दिवसभर हजारो भाविकांनी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
याप्रसंगी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, रामभाऊ कटकधोंड, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, ट्रस्टी सदस्य सुभाष बद्दूरकर, मोहन बोड्डू, सम्राट राऊत, रवी गुंड, रमेश देशमुख, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.