कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे

0
कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे 

आ आवताडे यांच्या मागणीवर कृष्णा-खोरे महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद 

प्रतिनिधी- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सदर मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, शिरनांदगी,  मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची,  पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना लाभ होतो. मागील दोन पाण्याची आवर्तने झाली परंतु मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्राच्या शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली तसेच मी स्वतः फोनद्वारे, पत्राद्वारे बऱ्याच वेळा पाणी देण्याबाबत मागणी केलेली असताना सुद्धा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळालेले नाही. आता पावसाळा सुरू असून वरच्या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून कृष्णा व पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून त्या नद्यांना पूर आलेला आहे परंतु मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये अलीकडे अत्यल्प पाऊस पडल्याने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे कृष्णा नदीतून वाहत जाणारे पाणी  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे या भागात दिले तर या भागातील बंधारे,  पाझर तलाव, साठवण तलाव भरून घेता येतील आणि या भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच दक्षिण भागातील शेतकऱ्यांची  पाणी मागणी असल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे टेल टू हेड नियमाप्रमाणे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, शिरनांदगी,  मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची,  पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना हे पाणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तसेच विशेषतः लवंगी, पडोळकरवाडी, शिरनांदगी व मारोळी येथील साठवण तलाव प्राधान्याने भरून द्यावेत अशीही मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

आमदार आवताडे या मागणीची दखल घेऊन सोमवारी पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले साहेब यांनी या विषयावर बैठक घेऊन अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना या योजनेतून येणाऱ्या पाण्यातून भागातील बंधारे, पाझर तलाव व साठवण तलाव भरून घेण्याचे निर्देशीत केले आहे. या योजनेद्वारे येणाऱ्या पाण्याचा येथील शेतकरी व नागरिकांनी आपापसात कोणत्याही प्रकारचे वाद न करता योग्य आणि आवश्यक पद्धतीने आपल्या भागातील सर्व बंधारे, साठवण व पाझर तलाव भरून घेण्याचे व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी त्याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !