मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
337 मतदान केंद्रांवर 3 हजार 710 कर्मचारी नियुक्त
चोख पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध
पंढरपूर, दि.04:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत जिल्ह्यात सोलापूर-42 (अ.जा.) व माढा-43 लोकसभा मतदार संघाचे मतदान दिनांक- 07 मे 2024 रोजी होणार आहे. 42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने विविध माध्यमातून जनजागृती केली आहे. नव मतदार आणि महिलांनीही या लोकशाही उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 55 हजार 138 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 83 हजार 292 पुरुष, 1 लाख 71 हजार 823 महिला व 23 इतर मतदार तसेच 555 सैनिक मतदारांचा समावेश आहे. मतदार संघात 337 मतदान केंद्रे असून त्यात आदर्श मतदान केंद्रातंर्गत महिला व्यवस्थापित दोन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापित एक मतदान केंद्र आणि युवा कर्मचारी व्यवस्थापित दोन मतदान केंद्र ही मतदान केंद्र विशेष राहणार आहेत. मतदान प्रक्रीया पारदर्शकपणे व सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह 3 हजार 710 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदार संघातील 173 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांना मंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांना व्हील चेअर, मतदान केंद्रात रॅम्प, ओआरएस पाकिटे, वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्ष, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, स्वतंत्र प्रसाधनगृह, पुरेशी प्रकाश व्यवस्था आदीबाबी उपलब्ध राहणार आहेत. मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आदि माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी बीएलओ मार्फत घरोघरी मतदार चिठ्ठ्या वाटप केल्या आहेत. तसेच एकाच ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मदतीसाठी स्वयंसेवक असणार आहेत. माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार असून, मतदारांचे नाव कोणत्या मतदार यादीत आहे. त्यांचे मतदान केंद्र कोणते याची माहिती हे स्वयंसेवक देणार आहेत.
लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजवावा व जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.