इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीला करणार प्रचाराचा शुभारंभ; पंढरपुरसह विविध धार्मिक स्थळांना देणार भेटी
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर (१७ एप्रिल २०२४) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बुधवारी त्या सर्वप्रथम पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी नारळ वाढवून त्या आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील. यानंतर त्या मतदासंघांतील विविध धार्मिक स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली.
प्रणिती शिंदे या पंढरपुरातून बुधवारी सकाळी ८ वाजता प्रचाराचा शुभारंभ करतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मार्डी येथील यमाई मंदिराचे दर्शन घेतील. त्यांनतर १२ वाजता बाळे येथील खंडोबा मंदिरास भेट देतील. तेथून त्या अक्कलकोटकडे रवाना होती. दुपारी दोन वाजता त्या स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतील. यानंतर ४ वाजता हत्तुर येथील सोमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरकडे मार्गस्थ होतील.
दरम्यान, सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास त्या सोलापुरातील मार्कंडेय मंदिरात दर्शन घेतील. पुढे, ६ वाजताच्या दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतील आणि ७ वाजता शहरातील जगदंबा चौक येथील राम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. यानंतर प्रणितीताई शिंदे या सभेला संबोधित करतील.
या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील INDIA आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नियोजित स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.