प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेची निवडणूक ही गरीबी विरुद्ध श्रीमंती अशी आहे. मी ऊसतोड कामगाराच्या सामान्य, गरीब कुटुंबातून आलो आहे, मला गरीबीची, त्यांच्या कष्टाची जाण आहे. त्यामुळे आपले सर्व प्रश्न मी सोडवू शकतो, असे सोलापूर लोकसभेचे भाजप- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी सोमवारी (ता.१५) कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथे सांगितले.
श्री. सातपुते यांनी आपल्या प्रचाराची सुरवात आज उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथून केली. या प्रचार बैठकीत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार, उपाध्यक्ष काशीनाथ कदम, कारंबा ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक सुतार, माजी सरपंच सौ. कौशल्या सुतार, युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष संभाजी दडे, योगेश गवळी, सदस्य युवराज पवार अमोल सुतार, अप्पासाहेब गुंड, भाजपा उपाध्यक्ष संजय आदाटे, शरीफ सय्यद, हनमंत भोरे अश्पाक शेख, भागवत कत्ते, अतुल रोकडे, सत्तार शेख, महिबुब शेख, मिथून शिंदे; आनंद इंगळे, माऊली काशीद, नरहरी गायकवाड, ओंकार गायकवाड, रावसाहेब शिंदे, ज्ञानेश्वर कांबळे, समाधान आदाटे आदी उपस्थित होते. यावेळी घोड्यावरुन मिरवणूक काढत फटाक्यांच्या आतिषबाजीने सातपुते यांचे स्वागत कऱण्यात आले.
श्री. सातपुते म्हणाले, उत्तर सोलापूर तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न यांना एवढ्या वर्षात सोडवता आला नाही, पण मी उर्वरित कामे पूर्ण करीन, सामान्य कुटुंबातला उमेदवार असल्याने यांच्यासारख्या श्रीमंताना हे पटलेले नाही. एवढीवर्षे राज्याची तिजोरी यांच्या हातात होती. ज्यांनी इथून निवडणूक लढवली, मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, राज्यपाल अशी पदे भूषवली, यांनी या तालुक्यासाठी काय केले, हा माझा प्रश्न आहे, पण आता विकासाचा विचार करुन आपण सर्वांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान केले पाहिजे, मला मत म्हणजेच मोदींना मत आहे, असेही ते म्हणाले.
शहाजीभाऊ पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज कामगार, कष्टकरी, महिला, शेतकरी या सर्वांसाठी योजना आणल्या. सर्वांना घरे, रेशनिंगचे धान्य, आयुष्यमान भारतसारखी आरोग्य योजना, शेतकऱयांसाठी पीएम किसान योजना, यासारख्या योजना आणून सर्वांच्या श्रमाची किंमत केली, ही किंमत विसरु नका, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या विकासपुरुषाच्या पाठीमागे आपण उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. ग्रामपंचायत सदस्य विनायक सुतार यांनी प्रास्ताविकात काँग्रेसचे सरकार लबाड आहे, यापूर्वी फक्त आश्वासने मिळाली, पण मोदी सरकारच्या काळात आमच्या भागात प्रत्यक्षात रस्त्यांसह विविध विकासकामे झाली, हे जनतेलाही माहिती आहे, देशाचे भविष्य घडवणाऱया या निवडणुकीत आम्ही मोदींच्याच पाठीशी राहणार आहोत, असे सांगितले. सुहास भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.