महिला शाहिरांचे योगदान महाराष्ट्राला कदापीही विसरता येणार नाही – प्रा. सुवर्णा हजारे

0
‘महिला शाहिरांचे योगदान महाराष्ट्राला कदापीही विसरता येणार नाही’ – प्रा. सुवर्णा हजारे

पंढरपूर – “संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही भारतासह महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. या चळवळीत पुरुष शाहिरांच्या बरोबरीने महिला शाहिरांनी देखील हा लढा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. महिला शाहिरांनी पोवाडे, ओव्या, पाळणे, स्फूर्ती गीते व संयुक्त महाराष्ट्र गीतांची रचना केली. सदर गीतांचे सादरीकरण त्यांनी केले. महिला शाहिरांच्या या कृतीला जनसामान्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या महिला शाहिरांचे योगदान महाराष्ट्राला कदापीही विसरता येणार नाही. इतिहासाने महिलांचे योगदान जेवढ्या गांभीर्याने नोंदवायला हवे होते. तेवढ्या तीव्रतेने नोंदविलेले दिसत नाही.” असे प्रतिपादन संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या अभ्यासिका प्रा. सुवर्णा हजारे यांनी केले. 
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत इतिहास विभाग आणि उमा महाविद्यालय यांच्यातील ‘फॅकल्टी एक्सचेंज योजना’ अंतर्गत उपक्रमात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महिला शाहिरांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राचीन इतिहास साहित्य आणि संस्कृती विभागाचे प्रमुख डॉ. रविराज कांबळे हे होते. यावेळी मंचावर इतिहास विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. हनुमंत लोंढे, प्रा.डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 
प्रा. सुवर्णा हजारे पुढे म्हणाल्या की, “कोणत्याही चळवळीत जोपर्यंत महिला सहभागी होत नाहीत. तोपर्यंत त्या चळवळीला जनसामान्यांचे अधिष्ठान प्राप्त होत नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न राजकीय पातळीवरून होत होते. भाषावार प्रांतरचनेच्या नियमाला सोयीस्कर डावलले जात होते. मराठी माणसांवर अन्याय केला जात होता. जोपर्यंत मराठी माणूस जागा होत नाही तोपर्यंत लढा यशस्वी होणार नाही. हे महिला शाहिरांनी जाणले होते. त्यांनी स्वत:कडे असलेले कौशल्ये, ज्ञान, कला, कसब वापरले, लोकगीतांची निर्मिती केली. स्त्रीगीतांची निर्मिती केली. पाळणे, ओव्या, स्फूर्ती गीते तयार केली. त्यांचे सादरीकरण केले. त्यामुळे सामान्य माणसांना लढण्याचे बळ प्राप्त झाले.” 
अध्यक्षीय भाषणात डॉ. रविराज कांबळे म्हणाले की, “महाराष्ट्राला लढाई आणि चळवळी या नव्या नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणसांच्या संघर्षाचा इतिहास लिहिला गेला आहे. मराठी माणूस स्वत:ची अस्मिता आणि स्वाभिमान टिकवून ठेवतो. त्यासाठी सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची त्याची तयारी असते. ज्या ज्या आंदोलनात स्त्रियांनी सहभाग नोंदविला आहे. ती आंदोलने यशस्वी झालेली आहेत.महिला शाहिरांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. मात्र त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, वक्त्यांचा परिचय आणि उपस्थितांचे स्वागत प्रा. कल्याण वाटाणे यांनी केले. या कार्यक्रमास इतिहास विभागातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. उमेश साळुंखे यांनी मानले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !