समाज सुधारण्यासाठी परमार्थाची कास धरा- हभप.बोधले महाराज
सहकार शिरोमणी कारखान्यावरील किर्तन सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता..
पंढरपूर (प्रतिनिधी) दि.09- परमार्थाची कास धरा, परमार्थाने आरोग्य् सुधारत असल्याचे हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले यांनी काल्याचे किर्तनाप्रसंगी आपल्या रसाळ वाणीतुन भक्तांना संबोधले. कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ दिवसापासून सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरु असलेल्या गाथ भजन व किर्तन सोहळ्याची सांगता हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले यांचे काल्याचे किर्तनाने करण्यात आली.
कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय वसंतराव दादा काळे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त आणि 22 व्या पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध सामाजिक, धार्मिक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, सहकाराला अध्यात्माची जोड देण्यासाठी हा सोहळा प्रतिवर्षी साजरा केला जातो. यंदाच्या गाथा भजन आणि कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीने कीर्तन सेवा अर्पण केली या कीर्तन सोहळ्याचा हरिभक्त परायण धनंजय महाराज गुरव यांचे किर्तनांने प्रारंभ करुन, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यासह आजरेकर मठाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण चौरे महाराज, पाटोदा येथील श्री क्षेत्र मीराबाई साहेब संस्थांच्या महंत राधाताई आईसाहेब महाराज, भाळवणी येथील हरिभक्त परायण रुपेश महाराज चौगुले, ह.भ.प.हनुमंत महाराज मार्कड बीडच्या कल्याण स्वामी संस्थेच्या ह.भ.प.साध्वी सोनाली दिदि करपे महाराजांनी आपल्या किर्तनात आपल्या सुश्राव्य वाणीने संपत्ती कमविण्यापेक्षा माणुसकी कमवा, मरावे परी किर्तीरुपी उरावे, मेल्यावर त्यांचे नांव निघावे, असे आपले आचरण व पुण्यकर्म असावे, ईश्वराची सेवा मनापासून करा, आपली संस्कृती जपा, प्रेम करणारच असेल, तर संतावर, भगवंतावर व आपल्या मातृभूमीवर करा, आई वडीलांची सेवा करा. संगत देवाशी, साधु-संताची करा, शिकवण भाविक भक्तांना देवुन सुश्राव्य् वाणीने भक्तांना मंत्रमुग्ध् केले.
सोहळ्यामध्ये देवाची आळंदी येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ महाराज धनुरे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह गाता भजन सादर केले गाथा भजन आणि कीर्तन सोहळ्याला तरुण पखवाज वादक माऊली कोलगे आणि आदेश काळे यांनी साथ दिली तर मंगेश उपासे आणि गणेश शिंदे यांनी गायनाला साथ दिली कार्यक्षेत्रातील शेतकरी वारकरी अशा हजारो भक्त भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेतला, परमेश्वर लामकाने सुरेश देठे नारायण शिंदे शंकर चव्हाण हभप धनाजी महाराज गुरव आणि हभप तात्या महाराज चौगुले यांनी या सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.