वसंतदादांनी कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभसारखी दिशादर्शक-दिपक साळुंखे
वसंतराव काळे शैक्षणिक संकुलात सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांचा 80 वा जयंती समारंभ संपन्न
वसंतदादांनी गाव खेड्यातील लोकांसाठी जिद्द व संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी दिशादर्शक असून त्यांचा संघर्षमय वारसा कृतीतून पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपण केले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक साळुंखे- पाटील यांनी केले. ते वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथे वसंतदादा काळे यांच्या जयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील व टीव्ही ९ मराठी च्या वृत्तनिवेदिका निकिता पाटील या होत्या .
यावेळी विचारपिठावर श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर माजी व्हाईस चेअरमन मारुती भोसले, राजेंद्र शिंदे परिवाराचे ज्येष्ठ नेते महादेव देठे राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे निशिगंधा बँकेचे चेअरमन आर.बी. जाधव व्हाईस चेअरमन सतीश लाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील कांतीलाल काळे उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपक साळुंखे म्हणाले की वसंतदादा प्रमाणे विद्यार्थ्यांनी मनात जिद्द ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. वसंतदादांच्या सामाजिक कार्याचा वारसा कल्याण काळे कृतीतून पुढे घेऊन जात असून निश्चितच दादांचे स्वप्न साकार होण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी बोलताना सांगितले की वसंतदादा काळे यांचा आदर्श व विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवावे आयुष्यात जन्माला काय म्हणून आलो यापेक्षा आयुष्यात स्वकष्टातून आयुष्य समृद्ध करावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वृत्त निवेदिका निकिता पाटील म्हणाल्या की थोर महापुरुषांचे विचार डोक्यात ठेवून आपली वाटचाल करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यशाला गवसणी घालावी. नम्रता हा सद्गुण कायम सोबत ठेवून संघर्ष व आव्हाने पेलण्याची उमेद बाळगली पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष कल्याण काळे यांनी सांगितले की दादा प्रतिकूल परिस्थितीतून घडले त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा कृतीतून जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने जपण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणे हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक आहे. शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी - सुविधा बरोबरच भक्कम पाठबळ दिल्याने प्रशासकीय सेवा व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होत आहेत हे दादांचे स्वप्न साकार होताना अत्यंत आनंद होत आहे.
याप्रसंगी प्राचार्य शिवाजीराव बागल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रशालेतील माजी विद्यार्थी महेश कौलगे यांची सहाय्यक कृषी अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल व प्रशांत ननवरे यांची भारतीय सांख्यिकी सेवेत निवड झाल्याबद्दल तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त खो-खो व डॉजबॉल मधील खेळाडू ,इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशिप धारक विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आजी- माजी संचालक सहकार शिरोमणी परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांनी मानले.