लोकप्रतिनिधींच्या मार्गावरील खड्डेदुरुस्तीसाठी भगीरथ भालके यांनी उठवला आवाज
काही तासातच प्रशासनाने केली रस्त्याची दुरुस्ती
भालके पती-पत्नीचे नागरिकांनी मानले आभार
पंढरपूर-मंगळवेढा या मार्गावरील पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरातून मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम केल्याने रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघात होत आहेत. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनाहि मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत येथील नागरिकांनी खड्डा बुजवण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली. मात्र माघवारीच्या कामात व्यस्त असल्याचे दाखवणाऱ्या प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले. याचबरोबर
आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व या मार्गावरून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन प्रशासनाला रस्ता दुरुस्तीबाबत सूचना देणे गरजेचे असतानाही लोकप्रतिनिधींनी खड्ड्याकडे दुर्लक्ष करत दुसरी कडून मार्ग काढणे पसंत केल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर ऐकवयास मिळत आहे.
याबाबत येथील नागरिकांनी युवक नेते भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर प्रणिताताई भालके यांनी सदर ठिकाणी भेट देऊन समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी केली.
यानंतर भगीरथ भालके यांनी तात्काळ मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधत नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्यावी. अन्यथा वेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागेल अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले.
भगीरथ भालके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही तासातच सदर मार्गावरील खड्डे प्रशासनाने दुरुस्त करून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतल्याने वाहनधारकांकडून आणि परिसरातील नागरिकांकडून भालके पती-पत्नी यांचे आभार मानले जात आहे.