मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना बापाचा दुर्दैवी मृत्यू
पंढरपूर मधील दुर्दैवी घटना मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पंढरपूर मध्ये राहणाऱ्या सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्नसोहळा होता. दरम्यान काल रात्री नवरदेवाची हळद होती. हळदी समारंभाचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. हळदी समारंभासाठी डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. वरात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वर पिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले.
यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाने मोठ्या प्रमाणात हंबरडा फोडला. या घटनेमुळं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली आहे.