स्वेरीच्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आयईआयचे सचिव मोहन देशपांडे
स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २३’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न
पंढरपूर: ‘आजच्या शैक्षणिक क्षेत्राचा विचार केला तर स्वेरीमधील शैक्षणिक पद्धती व ‘पंढरपूर पॅटर्न’ या बाबी खरोखरच अनुकरण करण्यासारख्या आहेत. स्वेरीमधील कोणत्याही उपक्रमांचे नियोजन असो अथवा ‘पंढरपूर पॅटर्न’ची शिक्षण पद्धती असो, याद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात दिवसेंदिवस भर पडून प्रगती साधली जात आहे. यात डॉ.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमांचे व शैक्षणिक उपक्रमांचे उत्तम नियोजन केले जात असल्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळत आहे. त्याचबरोबर ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २३’ सारख्या तांत्रिक इव्हेंटमुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त तांत्रिक कलागुणांना देखील प्रेरणा मिळते, त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास अधिक वाढतो.’ असे प्रतिपादन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडिया तथा आयईआयचे सचिव मोहन देशपांडे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या दोन विभागांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २३’ या एक दिवशीय तांत्रिक उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आयईआयचे सचिव मोहन देशपांडे हे मार्गदर्शन करत होते. विशेष अतिथी म्हणून एम.एस. देशपांडे हे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २३’ या उपक्रमाचे समन्वयक प्रा.जगदीश हल्लूर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा सांगितली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी ‘इ स्क्वेअर-लॉजिक’ बद्दल माहिती दिली तसेच ईलाईटच्या उपक्रमांवर देखील प्रकाश टाकला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाने अल्पावधीत घेतलेल्या गरुडझेपेची माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करून करिअर घडविले पाहिजे.’ असे सांगून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे आयईआयचे सचिव मोहन देशपांडे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेचे रुपांतर पेटेंट मध्ये करावे.’ असे सांगून तांत्रिक संशोधनातील महत्वाचे टप्पे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी ग्रामीण शिक्षणाचे महत्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांची प्रेरणादायी कविता ऐकवली. ट्रेनिंग अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी ‘विद्यार्थ्यांनी बुद्धीमत्ता चाचणी व सर्वसामान्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत.’ असे आवाहन केले. अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (अॅश्रे) च्या स्वेरीतील विभागाचे अध्यक्ष प्रा.दिग्विजय रोंगे यांनी ‘विद्यार्थी पूरक असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या राज्यस्तरीय उपक्रमात ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’मध्ये प्रोजेक्ट कॉम्पिटीशन, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, वीन टू बझ व प्रोग्रामींग मेनिया अशा पाच प्रकाराच्या स्पर्धा झाल्या तर ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’मध्ये आयडीया प्रेझेन्टेशन, टेक्निकल क्वीझ या स्पर्धा झाल्या. सर्व स्पर्धांमधून यशस्वी गुणवंतांना एक हजार रुपये पासून पाच हजार रुपयापर्यंतची अशी दोन्ही विभागांची मिळून एकूण पन्नास हजार रुपयापर्यंतची रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आली. या एक दिवसीय तंत्रस्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील जवळपास ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी दोन्ही विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी बिदर (कर्नाटक) मधील गुरुनानक देव इंजिनिअरींग कॉलेजचे डॉ.राजेंद्र कुलकर्णी, इंदापूर महाविद्यालयाचे प्रा.संज्योत पाटील, प्रा.सोमनाथ चिकणे, स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, दोन्ही विभागातील प्राध्यापक वर्ग, ईलाईटचे समन्वयक प्रा.सागर वाघचवरे, विद्यार्थी सचिव रोहीत मिसाळ, अनमोल कसबे आणि विद्यार्थी उपस्थित होते. धनश्री व्यवहारे व साक्षी रणनवरे यांनी सूत्रसंचालन केले. छायांकनाचे काम प्रतिक यादव यांनी पाहिले तर इसाचे समन्वयक श्रेयस कुलकर्णी यांनी आभार मानले.