काळे-भालके गटाच्या मतदारांचे लक्ष ' सांगाव्याकडे '
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत चुरस
पंढरपूर प्रतिनिधी दि.26- पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटासमोर श्री विठठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. मात्र निर्णायक ठरणाऱ्या काळे-भालके गटाच्या नेत्याकडून कोणता सांगावा येणार याकडे काळे-भालके मतदारांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटाच्या विरोधात विठठल परिवाराने तगडे आवाहन निर्माण केले होते. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काळे-भालके गटाकडून व्यापारी व हमाल तोलार मतदारसंघ वगळता सर्व जागेवर अर्ज दाखल केलेले होते. तर अभिजीत पाटील गटाकडूनही हमाल तोलार , व्यापारी, अनुसुचित जाती जमाती, आर्थिक दुर्बल व संस्था मतदार संघ वगळता इतर मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. विठठल परिवारात विभागलेल्या अभिजीत पाटील व काळे-भालके गटाचे मनोमिलन झाल्यास सत्ताधारी परिचारक गटासमोर कडवे आव्हान उभे करता येईल या हेतून परिवरातील काही पदाधिकाऱ्यांनी काळे-भालके व पाटील गटाचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही.
अभिजित पाटील यांनी या निवडणुकीत एकला चलो रे ची भुमिका घेत अर्ज भरलेल्या उमेदवारांचा पॅनेल उभा केला तर काळे भालके गटाचे नेत्यांनी आपले कायकर्त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. या निर्णयामुळे काळे-भालके गटाकडून कोणता निर्णय घेतला जाणार अशा प्रकारची चर्चा तालुक्यात सुरु असतानाच अतिशय सावध पवित्रा घेत कल्याणराव काळे यांनी काळे-भालके गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत बहुतेक पदाधिकाऱ्यांनी नेते मंडळी घेईल तो निर्णय आपणास मान्य राहिल असा सुर आळवला. कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेत निवडणुकी पुर्वी एक दिवस अगोदर मतदानाबाबत निर्णय देण्यात येईल तो पर्यंत कार्यकर्त्यांनी शांत रहा असा सबुरीचा सल्ला दिला.
तालुक्यात परिचारक व पाटील गटाची प्रचाराची राळ उडाली असताना देखील काळे भालके गटाचे मतदार अद्यापही प्रचारापासून अलिप्त राहून नेत्यांच्या सांगव्याची वाट पहात आहेत. काळे भालके गटाच्या मतदारांना गळ घालण्याचा प्रयत्न दोन्ही पार्टीच्या उमेदवारांकडून होत असला तरी मतदार मात्र आम्हाला सांगावा आला नाही असे सांगत आहेत. काळे भालके गटाच्या नेते मंडळीच्या सांगाव्यावरच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.