भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केला सलग १८ तास अभ्यास
‘मेसा’ च्या उपक्रमाचा सर्वत्र गौरव
पंढरपूरः- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून दि.१३ एप्रिल रोजी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून महामानव डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले. या अदभूत उपक्रमाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या ‘मेसा’ (मेकॅनिकल इंजिनिअरींग स्टुडंट्स असोसिएशन) च्या पुढाकाराने सलग १८ तास अभ्यास करण्याची संकल्पना वरिष्ठांसमोर मांडली.अशा स्तुत्य उपक्रमाला स्वेरीचे प्रशासन नेहमीच विनाविलंब हिरवा कंदील दाखवत असते. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर व मेसाचे समन्वयक प्रा.संजय मोरे, ‘मेसा’ विद्यार्थी अध्यक्ष निलेश ढेकळे तर उपाध्यक्षा अवंतिका आसबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आयोजिल्याप्रमाणे इंजिनिअरींगच्या सर्व विभागातील विद्यार्थी लायब्ररीच्या नूतन इमारतीमध्ये अभ्यासिका कक्षात तर विद्यार्थीनींनी स्वतंत्र अभ्यासिका कक्षात बैठक व्यवस्था केली होती. सकाळी ६ ते रात्री १२.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी एकाग्रपणे अभ्यास केला. सलग १८ तास अभ्यास करण्याचा विक्रम करून या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. आंबेडकर यांनी घालून दिलेल्या वाचन संस्कृतीची जपणूक केली आहे. यामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेमधील व सर्व विभागातील असे मिळून जवळपास २०० विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सलग १८ तास अभ्यास करण्याच्या या उपक्रमात सहभागी झाले होते. अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला रयत शिक्षण संस्थेच्या माढा येथील महाविद्यालयाचे डॉ.संतोष राजगुरू यांच्यासह स्वेरीचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकांनी भेट देवून पाहणी केली व या उपक्रमाचे मनस्वी कौतुक केले.