वीजवाहक तार तुटून 2 दुधाळ जनावरे दगावली
2 लाखांचे नुकसान
प्रतिनिधी / खेड भोसे
शनिवारी रात्री दहा वाजता वीज वाहक तार तुटून खेडभोसे येथील दोन दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सत्यवान विठ्ठल पवार (रा. खेडभोसे ता. पंढरपूर) यांच्या दारात बांधलेल्या एक म्हैस आणि एक जर्सी गाय यांच्या अंगावर 33 केव्हीं वीज वाहक तार तुटून पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला.
दोन्ही दुधाळ जनावरे अकस्मात मृत्यू झाल्याने सत्यवान पवार यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत तलाठी प्रकाश भिंगारे यांनी पंचनामा केला आहे.
खेड भोसे गावला वीजपुरवठा करणारी 33 केव्ही लाईन ही सुमारे 40 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली होती. या लाईनवर अतिरिक्त भार असल्यामुळे आणि चाळीस वर्षे जुनी असल्यामुळे हा अपघात झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून सत्यवान पवार यांच्या घरातील इतर सदस्यांना हानी पोहोचली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
या घटनेवरून तरी महावितरण कंपनीने बोध घेऊन खेडभोसे परिसरात असलेल्या जुन्या विजवाहक तारा बदलून नवीन तारा बसवाव्या, अशी मागणी खेडभोसे सोसायटीचे चेअरमन बंडू पवार यांनी केली आहे.