सण, उत्सव व विशेष दिना दिवशी ध्वनीक्षेपक वापरास सूट
सोलापूर, दि. 11 (जि. मा. का.) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अन्वये ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे व मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा वगळून इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात येणारे दिवस जाहीर करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निर्गमित केले आहेत.ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सन 2023 मध्ये सुट देण्यात येणारे 13 दिवस जाहीर करण्यात आले आहेत. तर उर्वरित 2 दिवस राखीव ठेवण्यात येवून महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात येणार आहेत. ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
सूट देण्यात येणारे दिवस
मकरसंक्रांत व श्री सिध्दरामेश्वर यात्रा, सोलापूर 15 जानेवारी, शिवजयंती 19 फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सांगता दिवस, गणपती उत्सवात चार दिवस (पहिला 19 सप्टेंबर, अष्टमी 26 सप्टेंबर, नवमी 27 सप्टेंबर, अनंत चतुदर्शी 28 सप्टेंबर), ईद ए मिलाद 28 सप्टेंबर किंवा चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे पुढे, नवरात्रौत्सव दोन दिवस (अष्टमी 22 ऑक्टोबर, नवमी 23 ऑक्टोबर), दीपावली (लक्ष्मीपूजन) 12 नोव्हेंबर, ख्रिसमस 25 डिसेंबर, 31 डिसेंबर (निरोप व नववर्ष स्वागत) या दिवशी सूट जाहीर करण्यात आली आहे.