येत्या रविवारी स्वेरीत होणार रंगांची मुक्त उधळण
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्वेरीत 'रंगसंवाद- २०२३’चे आयोजन
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या गौरवशाली रौप्यमहोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांच्या ललित कलागुणांना वाव देण्यासाठी स्वेरीमध्ये येत्या रविवार, दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी 'रंगसंवाद- २०२३’ या भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
१९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी या शिक्षण संस्थेने विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना तंत्रशिक्षणाची नवीन उर्जा देत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा दिली. याच श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर अर्थात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचा ज्ञानदायी प्रवास आता २५ वर्षांचा होतो आहे. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर या महाविद्यालयाच्या गौरवशाली रौप्य महोत्सवाकडे होत असलेल्या दमदार वाटचालीचे औचित्य साधून भव्य चित्रकला स्पर्धा 'रंगसंवाद' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. २०२२-२३ हे वर्ष स्वेरीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या वर्षात अनेक उपक्रम राबविण्याचे नियोजन असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी, दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० पर्यंत 'रंगसंवाद- २०२३’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कल्पना विश्वातील चित्रांना साकार करत, कागदावर सृजनरंगांची मुक्त उधळण करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले असून या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कला, त्यांचे कल्पनाविश्व पाहता येणार आहे. या स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. यामध्ये बाल गटामध्ये छोटा व मोठा शिशु वर्ग असणार आहे. यांच्यासाठी कोणत्याही विषयांवर चित्र साकारता येणार आहे. प्राथमिक गटात इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थी असणार आहेत. त्यांच्यासाठी 'माझे घर' हा विषय देण्यात आला आहे. किशोर गटात पाचवी ते सातवी मधील विद्यार्थी सहभागी होतील. त्यांच्यासाठी 'माझा आवडता उत्सव' हा विषय देण्यात आला आहे. कुमार गटात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होतील. त्यांच्यासाठी ‘माझा भारत महान’ हा विषय असेल, युवा गटात अकरावी व बारावी चे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा विषय असेल. दुसऱ्या युवा गटात म्हणजे उच्चमहाविद्यालयीन गटात- पदवी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील यांच्यासाठी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत!’ हा चित्रकलेचा विषय असेल. तिसऱ्या युवा गटात उच्चमहाविद्यालयीन विद्यार्थी असणार आहेत यामध्ये पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात तर यांच्यासाठी 'महाविद्यालय परिसर स्थळ चित्रण' असा विषय देण्यात आला आहे. चित्रकलेच्या स्पर्धेसाठी आखलेले नियम व अटी: स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी माहितीपत्रकाखालील 'सहभाग पत्र भरून देणे आवश्यक आहे. सदर सहभाग पत्र भरून आयोजक प्रतिनिधीकडे दिल्याशिवाय आपला सहभाग निश्चित केला जाणार नाही, स्पर्धेच्या दिवशी आपल्याला दिलेल्या वेळेतच चित्र काढून त्यात रंग भरून, आपले चित्र आयोजकांकडे द्यायचे आहे, स्पर्धेत विद्यार्थी, कलाकारांनी काढलेल्या चित्रावर आयोजकांचा पूर्ण अधिकार राहील, आपण आपल्याला दिलेल्या विषयावर चित्र काढायचे आहे, चित्र काढण्यासाठी व रंगवण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावयाचे आहे. आयोजकांकडून फक्त कागद दिला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, स्पर्धेसंदर्भातील कोणत्याही बाबतीत बदल करण्याचा अधिकार आयोजक महाविद्यालयाने राखून ठेवलेला आहे, सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेला येताना प्रवेशपत्रिकेचा वरील भाग सोबत आणणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गटासाठी व प्रत्येक क्रमांकासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रु. पंधराशे, द्वितीय क्रमांक- स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रु.एक हजार, तृतीय क्रमांकासाठी स्मृति चिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रु. पाचशे तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके असतील त्यात स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्रक असे स्वरूप असणार आहे. हा कार्यक्रम स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रांगणात होणार असून यासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 'रंगसंवाद- २०२३’ या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी स्वेरी अभियांत्रिकीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. यशपाल खेडकर (मो.नं.- ९५४५५५३६९९ ), डॉ. धनंजय चौधरी (मो.नं. ९८६०१६०४३१ ) , प्रा. पोपट आसबे (मो. नं. ७८२१००४६४७) व प्रा. अनुराधा पाटील (मो. नं. ७०५७३७६०६४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना 'सहभाग प्रमाणपत्र' देण्यात येईल. यासाठी स्वेरीतर्फे जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.