Mandous Cyclone;मांडोस चक्रीवादळा चा तामिळनाडू ला मोठा फटका ;
देशाच्या दक्षिण भागात 'मंदौस' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले आहे. याबाबत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रशासनाला सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
चेन्नई (तामिळनाडू) - 'मंदौस' चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वारा आणि वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. येथील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे 3 आंतरराष्ट्रीय विमानांसह 16 उड्डाणे रद्द करावी लागली. परिस्थिती लक्षात घेऊन चेन्नईत एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काही तास तामिळनाडूसाठी धोक्याचे असतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 400 कर्मचारी आधीच कावेरी डेल्टा भागांसह किनारपट्टीच्या भागात तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
यावादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर पुद्दुचेरी आणि कराईकल भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवार आणि शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंदौस चक्रीवादळाचा तीन राज्यांतील लोकांना धोका आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत दिसून येईल. अशा परिस्थितीत विल्लुपुरम जिल्ह्यात 12 ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी 16,000 पोलीस आणि 1,500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यात अनेक आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात आहेत. दरम्यान, आज तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांमध्ये चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार, मंदौस चक्रीवादळामुळे बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तर किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.