स्वेरी मधील विविध कोर्सेसच्या प्रथम वर्षाला १०० टक्के प्रवेश - स्वेरीचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे
स्वेरीत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
पंढरपूरः 'शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमधील प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी, एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांचे प्रवेश १०० टक्के झाल्यामुळे प्रथमत: स्वेरीवर भरभरून विश्वास ठेवलेल्या सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार. अभियांत्रिकीमधून करिअर करताना प्रत्येक ब्रँच चांगली असते. आपण कोणत्या ब्रँचमध्ये शिक्षण घेत आहोत ती जगातील सर्वात चांगली ब्रँच असते असे समजून त्या ब्रँचला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि त्या क्षेत्रात लीडर बनून त्या ब्रँचचे महत्व सिद्ध करून दाखवायची विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी. करिअरची सुंदर इमारत बनवायची असेल तर कठोर परिश्रमाचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे. कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते, परंतु आयुष्याची वाटचाल कोणत्या पद्धतीने करायची? हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. आपल्या मनाचा प्रवास हा स्पष्टतेकडे जाणारा असावा, त्यामुळे यशस्वीतेसाठी योग्य दिशा मिळते.‘स्वेरी’ हे प्रामाणिकतेचे व परिश्रमाचे प्रतीक आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना करिअर योग्य बनविणे हे स्वेरीचे ध्येय आहे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मधील पदव्युत्तर, पदवी व पदविका या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगला प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्वागत समारंभ व १०० टक्के प्रवेश झाल्याबद्दल पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ रोजी दहशतवाद्यांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात शहीद झालेल्या शुरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणुन पांडुरंग ताटे, पत्रकार प्रशांत माळवदे, तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.उमाताई भोसले ह्या उपस्थित होत्या. दिपप्रज्वलनानंतर प्रा.यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकातून स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीतील महत्वाचे टप्पे, मिळालेली मानांकने, संशोधन निधी, वसतिगृहे, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या सोईसुविधा आदींबाबत माहिती दिली. पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना पांडुरंग ताटे म्हणाले की, ‘ध्येयाने वेडी झालेली माणसे इतिहास घडवितात. इथे डॉ. रोंगे सरांनी अत्यंत कठीण परिस्थितीत तंत्रशिक्षण देण्याचा जो इतिहास रचला आहे तो खरोखरच असामान्य आहे. रोंगे सरांचे बहुमोल विचार ऐकून खरंच गुरूंचा आदर नेहमीच केला जातो आणि केला पाहिजे, हे समजते. या सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वेरीत उत्तम प्रकारे विद्यार्थी घडत आहेत. शिक्षण सर्वत्र मिळते पण स्वेरीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच माणूस घडविण्याचे महत्वाचे कार्य अविरतपणे सुरु आहे, हे महत्वाचे आहे.’ पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘पालक व विद्यार्थ्यांनी स्वेरीवर टाकलेला विश्वास मुळीच वाया जाणार नाही. आमचा संपूर्ण स्टाफ हा विश्वास सार्थ ठरविणार आहे. आदरयुक्त संस्कार व कठोर परिश्रम केल्यामुळेच स्वेरीचे विद्यार्थी यशस्वी होत असतात आणि मिळालेले यश हे मानसिकतेवर अवलंबून असते यासाठी प्रथम यशाची मानसिकता तयार करावी कारण मार्गदर्शनाबरोबरच योग्य दिशेची जोड दिल्यास आपले करिअर यशस्वी होते.’ असे सांगून जगप्रसिद्ध तत्ववेत्ता मार्क ट्वेन यांच्या यशाचे गुपीत सांगताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ‘योग्य दिशेबरोबरच कठोर परिश्रम करण्याची गरज आहे' असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, 'जीवनात निर्णय घेताना अभियांत्रिकीचे शिक्षण महत्वाचे ठरते. यासाठी प्रत्येक क्षेत्रात खात्रीशीर माहिती घेवून त्यावर ठामपणे निर्णय घ्यावा. आपण जोपर्यंत प्रयत्न करणे सोडत नसतो तोपर्यंत अपयश हे अंतिम नसते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला मुळीच कमी लेखू नये. स्वेरीमधील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारची कंपनी कशी मिळेल? जास्तीत जास्त पॅकेज कसे मिळेल? याकडे स्वेरीचा प्रामुख्याने कल असतो. गतवर्षी विद्यार्थ्यांना ६०५ नोकरीच्या संधी प्राप्त करून दिल्यामुळे व एका विद्यार्थ्याला रु. ४१.५ लाख एवढे वार्षिक पॅकेज मिळाल्याबद्दल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व त्यांच्या टीमचा विशेष गौरव करण्यात आला. एकूणच तंत्रशिक्षणात स्वेरी ब्रँडला राज्यात विशेष स्थान प्राप्त झाले आहे, हे नक्की! याप्रसंगी स्वेरीचे विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज व वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रथम वर्ष विभागप्रमूख डॉ.एस.ए.लेंडवे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, सिद्धी बुडुख, आदेश करकंबकर, जम्मू काश्मीर मधील तसेच सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व त्यांचे पालक असे मिळून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.