हर हर महादेव चित्रपट दाखवल्यास "या" वाहिनी चे कार्यालय फोडू ; संभाजी ब्रिगेडच्या चा इशारा ;
इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याने हर हर महादेव या चित्रपटाविरोधात राज्यात शिवप्रेमी संतप्त झाले असून ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
मात्र, तरीदेखील झी टॉकिजने १८ तारखेला हर हर महादेव चित्रपट दाखविण्याचे जाहीर केल्याने संभाजी ब्रिगेड संतप्त झाली आहे. हा चित्रपट दाखविल्यास झीचे कार्यालय फोडू असा तीव्र इशारा ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी याबाबतचे निवेदन स्थानिक पोलिस ठाण्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनाही दिले आहे.
काळे म्हणाले, हर हर महादेव चित्रपटामध्ये अनेक चुकीचे व वादग्रस्त संदर्भ दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरातील शिवप्रेमींमध्ये या चित्रपटाविषयी रोष निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडनेही या चित्रपटाचे शो दाखवू नयेत, यासाठी टोकाचा विरोध केलेला आहे. त्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही न ऐकल्याने या चित्रपटाचे शो बंद पाडले आहे. त्यानंतर राज्यातील चित्रपटगृहात शो न दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता नुकतेच झी टॉकिज या वाहिनीवर हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी दाखविणार असल्याचे जाहीर केल्याने राज्यात कायदा व सुवस्थेचा प्रश्न उद्वभवू शकतो असे काळे म्हणाले.
त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून हा चित्रपट दाखवू नये, अन्यथा,संभाजी ब्रिगेड झी टॉकिजच्या कार्यालयावर जाऊन तीव्र आंदोलन छेडेल. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संबंधीत चॅनेल जबाबदार असेल, असा इशाराही काळे यांनी दिला आहे.