राष्ट्रीय किसान दिनाच्या औचित्य साधून कर्तबगार महिला सन्मान सोहळा व शेतकरी मेळावा संपन्न
बेगमपूर येथील फिनोलेक्स पाईप्स पुणे आणि आदित्य इरिगेटर्स बेगमपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या "कर्तबगार महिला सन्मान सोहळा व शेतकरी मेळावा" या कार्यक्रमासाठी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या पत्नी मा.सौ.अंजलीताई समाधान आवताडे या प्रमुख पाहुण्या म्हणून विचारमंचावर विराजमान होत्या.
सदरप्रसंगी विविध क्षेत्रात आपल्या कार्य - कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना मा.सौ. ताईसाहेब यांनी सांगितले की, विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी पूजनीय आहे.
स्वतः अर्थपोटी उपाशी राहून जगाचे पोट भरणारे शेतकरी बांधव आमच्यासाठी खरे नायक आहेत. अन्नदाता बळीराजाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आर्थिक सुबत्ता आणि शांती येवो अशी प्रार्थना करून नैसर्गिक संकटांचा सामना करत धीराने उभ्या असलेल्या, मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला 'राष्ट्रीय किसान दिवसाच्या' मा. सौ. ताईसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मा. जनार्धन शिवशरण, माजी जि. प. सदस्या मा. सौ. शैलाताई गोडसे, मा. सौ. करुणाताई शिवशरण आदी मान्यवर व महिला भगिनी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.