पोलीसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहे, तेही कलम 354चे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे.
"पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार . मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत," असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.
कार्यक्रमांच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आव्हाड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
कळवा पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. शिंदेंचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला आमने-सामने आले.
आव्हाडांनी त्यांना बाजूला करुन पुढे केले. यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केला असल्याचे त्या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
"आव्हाडांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून 'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो' असे म्हणत ढकलले, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात त्या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.