पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये शैक्षणिक धोरण कार्यशाळा संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (ता.पंढरपूर) येथे शनिवार दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शैक्षणिक धोरण याविषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यशाळेत पंढरपूर, सांगोला, सोलापूर येथील सिंहगड पब्लिक स्कूल मधील एकूण १३७ हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी शाळेने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत पुणे येथील सी.बी.एस.ई. बोर्डचे मास्टर ट्रेनर सुधांशू नायक व वृंदा जोशी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी शैक्षणिक धोरण ज्ञानरचना वाद आणि वर्तनवादावर कसे आधारित आहे यांवर शिक्षकांशी संवाद साधला. नवीन शैक्षणिक धोरणाची गरज ते कसे ज्ञान रचना वादाबरोबरच विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्रियाशीलता यावर आधारित असणार आहे याविषयी माहिती दिली.
तसेच या धोरणात विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज, अनुभवातून शिक्षण इत्यादी बाबींवर कसा भर दिला आहे. हे देखील अतिशय सोप्या भाषेत, रंजक पद्धतीने, शिक्षकांना छोटे छोटे प्रश्न विचारून, संवादातून उत्तम पद्धतीने सांगितले.
विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी त्यांना ज्ञान घेण्यास उद्युक्त करणे, त्यांच्या बुद्धीला चालना देणे गरजेचे आहे यावर भर देणे आवश्यक आहे, पाठयविषयांचा परस्परसंबंध स्थापन करता येणे, परस्पर सहकार्यातून, एकमेकांच्या कौशल्याचा उपयोग करून वर्गाला दिलेले एखादे कार्य पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना सवय लावणे इत्यादी गोष्टी शिक्षक कशा प्रकारे घेऊ शकतात याचेही मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.