एका माणसाने दाखवली सापाला जीभ आणि....... अंधश्रद्धेमुळे काय होऊ शकते याचे उदाहरण
आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबत असतात. काही लोक तांत्रिकांच्या सल्ल्यानुसार चालतात आणि त्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
तामिळनाडूत राहणारा राजा नावाचा इसम (नाव बदलले आहे) हा समस्यांनी ग्रस्त होता. त्याला त्यावर उपाय हवा होता. पण मार्ग सापडत नसल्याने त्याने शेवटी तांत्रिकाची वाट धरली. त्याला रात्री स्वप्ने पडत असत. त्यात सरपटणाऱ्या प्राण्याकडून त्याला चावा घेतला जात आहे, असे त्याला दिसत असे. या स्वप्नांमुळे तो विवंचनेत सापडला होता. काय करावे, कसे यातून बाहेर पडावे असा विचार तो करू लागला. त्यामुळेच त्याने तांत्रिकाकडे जाण्याचे ठरविले.
त्या तांत्रिकाने त्याला अजब सल्ला दिला. त्याने राजाला सांगितले की, तुला सापाच्या जवळ जात तुझी जीभ त्याला चावू द्यायला हवी. त्याप्रमाणे राजा या इसमाने सापाच्या बिळाजवळ जात आपली जीभ बाहेर काढली. त्या बिळात असलेला घोणस जातीचा साप त्याच्या जिभेला डसला. तत्क्षणी राजा तिथे कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याची जीभ आता कापण्यात आली आहे.
तामिळनाडूत अशा प्रकारच्या अनेक गोष्टी लोक करत असल्याचे समोर आले आहे. सापाकडून आपल्या जिभेला चावून घेणे याप्रकारची एक अंधश्रद्धा लोकांमध्ये आहे त्यातून अशा घटना घडतात. अखेर राजा नावाच्या या माणसाला आपली जीभच गमवावी लागली.